पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३६
वैयक्तिक व सामाजिक

 या सप्तशृंखला तोडून टाकण्यास सावरकरांच्या मते एकच घण उपयोगी पडेल आणि तो म्हणजे बुद्धिप्रामाण्य, प्रत्यक्षनिष्ठ व प्रयोगक्षम धर्म, विज्ञाननिष्ठा हा होय. रत्नागिरीला स्थानबद्ध असताना या घणाचेच घाव ते या स्वदेशी बेड्यांवर घालीत होते. जातिभेद, अस्पृश्यता आणि एकंदर जन्मजात उच्चनीचता यांच्या मुळाशी असलेल्या कल्पना किती वेडगळ, किती अशास्त्रीय, किती भ्रांत व अधर्म्य आहेत ते त्यांनी अनेक लेखांतून दाखवून देण्यास प्रथम प्रारंभ केला.
 पूर्वीच्या काळी भारतात शेकडो वर्षे श्रुतिस्मृतींच्या आज्ञेनेच वर्णसंकर कसा चालू होता, अनुलोम विवाहपद्धतीने का होईना, पण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांच्यात सर्रास विवाह कसे होत होते, ब्राह्मणाची धर्मपत्नी म्हणून शूद्र स्त्री समानतेने एकाच घरात कशी नांदत होती आणि तिची मुले ब्राह्मणच कशी गणली जात होती ते सावरकरांनी 'मनुस्मृतींतील महिला,' 'जातिभेदाचे इष्टानिष्टत्व' या आपल्या लेखमालांतून दाखवून दिले आहे. त्यावरून पाहता 'वेदकालापासून आम्ही शुद्ध वंशाचे आहो,' असे भारतात वास्तविक कोणाही शुद्धीवर असलेल्या समाजाला म्हणता येणार नाही. जातिभेदाला धर्माचा सनातन आधार आहे हे म्हणणे क्षणमात्र टिकणार नाही. इतकेच नव्हे तर जातिभेद म्हणजे हिंदूंना (कोणच्याही अर्थाने का होईना) अत्यंत प्रिय असलेले जे चातुर्वर्ण्य त्याचा उच्छेद होय हे श्रुतिस्मृतींच्या वचनांनीच सावरकरांनी दाखवून दिले आहे. त्याचप्रमाणे संकराविषयीच्या भ्रांत कल्पनाही त्यांनी आपल्या धर्मग्रंथाच्या आधारेच निरस्त केल्या आहे. संकरज प्रजा कित्येक वेळा औरस प्रजेपेक्षाही प्रबळ व कर्तृत्वसंपन्न झाल्याची विदुर, वसिष्ठ, चंद्रगुप्त, विक्रमादित्य, महादजी इ. अनेक उदाहरणे देऊन संकर हा मुळीच अनर्थकारक नाही असे त्यांनी वारंवार सांगितले आहे. ज्या विवाहामुळे प्रजा नाकर्ती होते, दुबळी, कर्तृत्वहीन होते किंवा विवाहित स्त्री-पुरुष प्रजोत्पादनाला अक्षम ठरतात त्यालाच फक्त संकर म्हणावे असे सावरकरांचे मत आहे. या दृष्टीने पाहता आपले सर्व जातिभेद, वर्णभेद हे केवळ पोथीजात आहेत, त्या भिन्न जातींनी आपसांत विवाह केले तर तो संकर मुळीच होणार नाही असा सावरकरांचा ठाम सिद्धान्त आहे. आणि हा सिद्धान्त त्यांनी श्रुतिस्मृती, पुराणे व इतिहास यांच्या आधारेच मांडला आहे.