पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे. त्रेदोक्तबंदी, व्यवसायबंदी, स्पर्शबंदी, सिंधुबंदी (परदेशगमन- निषेध) शुद्धिबंदी (पतितांना परत स्वधर्मात घेण्याची मनाई), रोटीबंदी आणि बेटीबंदी यांना सावरकर सात स्वदेशी बेड्या, सात स्वदेशी शृंखला म्हणतात. म्लेच्छ, पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज यांनी आपल्याला जिंकून आपल्या पायांत बेड्या घातल्या त्या परदेशी बेड्या होत. पण त्या बेड्या आपल्या पायांत पडल्या याचे मुख्य कारण हे की हे शत्रू येथे येण्यापूर्वी आपणच आपल्या पायांत या सात बेड्या ठोकून स्वतःच करंटेपणाने परतंत्र होऊन बसलो होतो. या सप्तशृंखला, पोथीजात जातिभेदाचे हे प्राणघातक विळखे आपण तोडून टाकले की त्या विदेशी बेड्या तोडण्यास आपणांस मुळीच अवधी लागणार नाही असा सावरकरांनी सिद्धान्त मांडला आहे. अमके राजकारण आणि अमके समाजकारण हा भेद त्यांच्या मते किती कृत्रिम आहे हे यावरून दिसून येईल. 'राजकारण ही एका हातातील चढती तलवार आणि समाजकारण ही दुसऱ्या हातातील बचावती ढाल' असे त्यांनी एका ठिकाणी या दोन 'कारणां'चे वर्णन केले आहे.
 ते म्हणतात, 'शतवार सांगितले तरी पुन्हा सांगतो की, हिंदुराष्ट्राच्या अभ्युत्थानास्तव राजकारण व समाजकारण ही दोन्ही साधने अत्यावश्यक आहेत. यांपैकी कोणतेही एक दुसऱ्यावाचून पंगू आहे.' हिंदुराष्ट्रं प्रबळ व्हावयाचे तर हा समाज एकजीव, एकात्म व संघटित झाला पाहिजे. सोळाव्या शतकापासून मराठे भारतात राजकारण करीतच आहेत. पण त्याला समाजकारणाचा पाठिंबा न मिळाल्यामुळे, त्या सात स्वदेशी बेड्या पायांत तशाच ठेवून मराठे लढत असल्यामुळे, मोगली आक्रमण मोडून काढण्यास जरी त्यांना यश आले तरी पाश्चात्त्य संघटित, एकात्म राष्ट्रांशी गाठ पडताच ते नामोहरम झाले हे इतिहासात आपण पाहतच आहो. आजच्या राजकारणातही आपणास तेच दिसत आहे. गेल्या शंभर वर्षांच्या प्रयत्नाने त्या सात बेड्या काहीशा ढिल्या झाल्या म्हणून आपणांस स्वातंत्र्य मिळाले. पण त्या निखालस तोडून टाकण्यात आपल्याला अजूनही यश आलेले नाही. त्यामुळे आजचे राजकारण नासत चालले आहे; म्हणून 'राजकारण हे समाजकारणावाचून नेहमी पंगूच राहणार' हा स्वातंत्र्यवीरांचा सिद्धान्त आजही शिरोधार्यच वाटतो.