पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३४
वैयक्तिक व सामाजिक

वाचताना आजही हे आपण एखादे स्वप्न तर पहात नाही ना, अशी शंका येऊ लागते.
 इतक्या दृढपणे आसनस्थ झालेला हा पर्वत, हा रत्नागिरी स्वा. वी. सावरकरांनी हलविला कसा, कोणच्या पुण्याईने त्यांना हे सामर्थ्य प्राप्त झाले हा मोठा विचारणीय प्रश्न आहे. क्रांतिकारक राजकारणांतली सावरकरांची अलौकिक देशसेवा, त्यांनी केलेला त्याग, अंदमानला भोगलेले कप्ट हीच पुण्याई येथे कारणीभूत झाली असावी असे वाटते. पूर्वीच्या काळी ऋषिमुनी अरण्यांत जाऊन बारा बारा वर्षे तपश्चर्या करीत आणि मग त्यांना दिव्य सामर्थ्य प्राप्त होई.
 सावरकरांनी अंदमानमध्ये जातिभेदाचा, अस्पृश्यतेचा हा नरकासुर भस्म करून टाकता येईल असे सामर्थ्य आपणांस प्राप्त व्हावे म्हणूनच चवदा वर्षे जणू तपःसाधना केली आणि तीतून प्राप्त झालेली अमोघ शक्ती त्यांनी या असुरावर सोडली. अत्यंत अल्पावधीत त्याचे निर्दालन करण्यात त्यांना यश आले त्याचे हेच कारण होय. या संग्रामात त्यांनी इतर आयुधे, इतर शस्त्रास्त्रेही अनेक वापरली यात शंकाच नाही; पण ही अमोघ शक्ती हे त्यांचे प्रधान अस्त्र होय.
 ही शक्ती व इतर शस्त्रास्त्रे हाती घेऊन त्यांनी हा संग्राम कसा केला ते आता पाहावयाचे आहे. या संग्रामाची, या युद्धाची ही कथा खरोखरीच मोठी रम्य आहे.
 हजारो वर्षे, निदान गेली हजार वर्षे जातिभेद व अस्पृश्यता यांमुळे हा हिंदुसमाज छिन्नविच्छिन्न होत आला आहे. प्राणज्योती नष्ट झाल्यावर एखादे प्रेत जसे सडत जाते, त्याचे अवयव विगलित होतात आणि शेवटी त्या मृत देहाचा कण न् कण फुटून निराळा होऊ लागतो तशी बुद्धिप्रामाण्य, विवेकनिष्ठा, प्रत्यक्ष व प्रयोगनिष्ठ शास्त्रावरची श्रद्धा नष्ट झाल्यामुळे या हिंदुसमाजाची स्थिती झाली होती. प्रथम इस्लामी आक्रमण आणि त्यानंतर पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज यांचे आक्रमण याना तो सहजासहजी बळी पडत गेला, याच्या अनेक कारणांपैकी हे एक प्रधान कारण आहे. अस्पृश्यता (स्पर्शबंदी) व जातिभेद (बेटीबंदी) यांतून अनेक प्रकारच्या बंदी कशा निर्माण झाल्या आणि त्यांमुळे कोणची अनर्थपरंपरा ओढवली याचे बॅ. सावरकरांनी फार उत्कृष्ट वर्णन केले