पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 'त्नागिरीतील हे सामाजिक मतपरिवर्तन पाहून मी नि:शंकपणे सांगतो की येथे घडत असलेली सामाजिक क्रांती खरोखर अपूर्व आहे. रत्नागिरी- सारख्या रेल्वे-टेलिफोनचे तोंड न पाहिलेल्या सोवळ्याच्या बालेकिल्ल्यांत अस्पृश्यतेचे उच्चाटन करून आज जन्मजात जातिभेदाचेच उच्चाटन करण्यास तुम्ही सजला आहात, याचा मला इतका आनंद होत आहे की हे पाहण्यास मी जगलो हे ठीक झाले असे मला वाटते. मी कुणाचा भाट होऊ इच्छीत नाही. पण ज्या स्वातंत्र्यवीराने आपल्या अज्ञातवासाच्या अवघ्या सात वर्षांत ही अपूर्व सामाजिक क्रांती घडवून आणली त्या बॅ. सावरकरांचा किती गौरव करूं असे मला झाले आहे. त्यांनी चालविलेली सामाजिक क्रांतीची ही यशस्वी चळवळ पाहून मी इतका प्रसन्न झालो आहे की देवाने माझे उरलेले आयुष्य त्यांसच द्यावे ! कारण माझे अपुरे राहिलेले हेतू पुरवील तर हाच पुरवील असे मला वाटत आहे.' कर्मवीर महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांचे हे उद्गार आहेत.
 १९३३ सालच्या महाशिवरात्रीच्या दिवशी रत्नागिरीस अस्पृश्यतेचा पुतळा जाहीर समारंभाने जाळण्यांत आला. कर्मवीर शिंदे हे त्या मंगल समारंभाचे अध्यक्ष होते. रत्नागिरीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केवळ सात वर्षांत घडवून आणलेली सामाजिक क्रांती पाहून महर्षीचा आत्मा संतुष्ट झाला आणि त्यांनी त्यांच्या कार्याला वरीलप्रमाणे आशीर्वाद दिला.
 सावरकरांनी रत्नागिरीस केलेले कार्य खरोखर अभूतपूर्व असेच आहे. भारताच्या इतिहासात पाच हजार वर्षांत अस्पृश्यता व जातिभेद यांचे असे तत्त्वज्ञानपूर्वक उच्चाटन कधीच झाले नव्हते. त्या चळवळीचा इतिहास