पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पलाप करावा लागतो आणि प्रतिकूल प्रमाणे गाळून टाकावी लागतात--' एच्. ए. एल्. फिशर हा एक फार मोठा इतिहासपंडित आहे. 'युरोपचा इतिहास' या आपल्या सुप्रसिद्ध ग्रंथाच्या प्रस्तावनेत त्याने हाच भावार्थ व्यक्त केला आहे. तो म्हणतो, "मी निओलिथिक युगापासून स्टॅलिन- हिटलर- पर्यंत इतिहास दिला आहे. त्यात अनेक स्थित्यंतरे, उलथापालथी यांचे वर्णन आहे. पण एक बौद्धिक दृष्टी दुर्दैवाने मला प्राप्त झालेली नाही. माझ्यापेक्षा जास्त विद्वान् व प्रज्ञावंत पुरुषांना इतिहासात काही सूत्रबद्धता, काही योजना दिसते. पण या सुसंगतीचा अवगम मला झालेला नाही. सागरावर लाटांमागून लाटा येतात. तशा इतिहासात एकामागून एक घटना घडतात. सर्वाना बांधील असा नियम, असा साधारण सिद्धान्त त्यांत दिसत नाही. मानवाच्या भवितव्याचा विचार करताना अनाकलनीय, आकस्मिक, योगायोगवश असे काही गृहीत धरलेच पाहिजे. मानवाची प्रगती झालीच नाही असे मी म्हणत नाही. पण तो इतिहासाचा नियम नाही."
 मानवी इतिहासाचे शास्त्र का होऊ शकत नाही हे यावरून ध्यानात येईल. मानवी मन, त्याची बुद्धी, प्रज्ञा, त्याच्या वासना, यांचे पुरेसे ज्ञान अजून आपल्याला प्राप्त झालेले नाही. आणि जो जो अभ्यास वाढत आहे तो तो हे मन जास्तच गूढ व अनाकलनीय होत चालले आहे. मानवाचे शरीरव्यापारही अजून अज्ञात आहेत आणि एकंदर मानवच अज्ञात आहे असे अलेक्सिस कॅरेलसारखे नोबेल प्राइझ मिळविणारे आयुर्विद्याविशारदही म्हणत आहेत. जडसृष्टीच्या शास्त्रांची निश्चितता सुद्धा गेल्या शतकात होती तितकी आता राहिलेली नाही असे सुलिव्हान ('लिमिटेशन्स् ऑफ सायन्स' या ग्रंथाचे लेखक) सारखे पंडित सांगत आहेत. अशा स्थितीत मानवाच्या घडा- मोडीचे ग्रहज्योतिषाइतके सुनिश्चित शास्त्र कोणी करू पाहील तर त्याला अनेक प्रतिकूल घटना गाळाव्या लागतील, अनेक घटनांचा विपर्यास करावा लागेल, अनेक ठिकाणी असत्याचा आश्रय करावा लागेल. मार्क्सवादाने तसे केले आहे. म्हणूनच ऐतिहासिक जडवाद हे त्याचे शास्त्र ग्रहज्योतिष न होता फलज्योतिष झाले, भविष्यशास्त्र न होता भविष्यपुराण झाले.