पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३१
मार्क्सचे भविष्यपुराण

पण ते अवतरले नाहीत. वायक्लिफ, लूथर, गॅलिलिओ, न्यूटन, बेकन, जॉन हस, लॉक, रूसो यांच्यासारखे पुरुष भारतात निर्माण झाले असते तर धर्मस्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य, विज्ञान, लोकसत्ता ही तत्त्वे येथे उदयास येऊन ही भूमि बलाढ्य झाली असती. येथल्या अर्थसाधनांच्या विकासाला त्यांची निश्चित आवश्यकता होती. आठव्या शतकात आरबांनी स्पेन जिंकला आणि त्याच वेळी फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड इकडे त्यांनी मोहरा वळविला होता, पण चार्ल्स मार्टलने त्यांचा पराभव करून त्यांच्या आक्रमणास कायमचा पायबंद घातला. हे टळले ते चार्ल्स मार्टलमुळे; तो नसता तर पश्चिम युरोप आज रूमानिया, बल्गेरिया, इजिप्त, यांच्यासारखाच झाला असता. स्पेन तसा झालाच. मार्टलची फ्रान्स, जर्मनीतच आवश्यकता होती आणि या इतर देशांत नव्हती काय ? पण तो झाला नाही; आणि महापुरुष असे हुकमी निर्माण होतच नाहीत. म्हणून तर मानवाचे भवितव्य सर्व अनिश्चित आहे, अज्ञात आहे. मार्क्सवादाला नेमके हेच कळत नाही.
 मार्क्सची भविष्यकल्पना काय आहे, त्याने व त्याच्या सहकाऱ्यांनी कोणची भविष्ये सांगितली, ती कितपत खरी ठरली, त्याची त्याच्या अनुयायांत पुढील काळात काय प्रतिक्रिया झाली हे सांगून मार्क्सचा भविष्यविचार शास्त्र न ठरता पुराण का ठरला याची येथवर चिकित्सा केली. आता युरोपातल्या दोन थोर पंडितांची या विषयावरची मते सांगून समारोप करतो. 'फ्रीडम् अँड ऑर्गनायझेशन' हा रसेल याचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. १८१४ ते १९१४ या शतकातील युरोपीय इतिहासाची त्यात मीमांसा केली आहे. त्याच्या प्रस्तावनेत रसेल म्हणतो, 'या शतकात जी अनेक स्थित्यंतरे झाली त्यांच्या बुडाशी माझ्या मते तीन कारणे आहेत. आर्थिक यंत्रणा, राजकीय तत्त्वज्ञान (राष्ट्रवाद, राजनिष्ठा, समाजवाद इ०) आणि थोर प्रभावी पुरुष. यांतील एकही कारण दुर्लक्षून चालणार नाही. तीनही स्वतंत्र आहेत. एकामुळे दुसरे उद्भवले असे कोणाच्याही बाबतीत म्हणता येणार नाही. व्यक्तीला जे महत्त्व त्याचा कार्लाइलने अतिरेक केला. पण आता आपण दुसऱ्या टोकाला जात आहो. माझ्या मते बिस्मार्क नसता तर जर्मनीचा इतिहास बदलला असता. आणि हेच इतर पुरुषांविषयी. याचा अर्थ असा की इतिहास हे शास्त्र नाही. ज्यांचा तसा आग्रह आहे त्यांना सत्या-