पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३०
वैयक्तिक व सामाजिक

मीमांसा करताना इकडील कम्यनिस्ट भटजी म्हणतात, "राजन्य वर्ग आपसात सारखा लढत राहिल्यामुळे कृषी, शिल्प, वाणिज्य इ. व्यवसायांना भरभराट येत नव्हती. एकछत्री साम्राज्याची त्याकरिता आवश्यकता उत्पन्न झाली." ही खरोखर आसुरी मीमांसा आहे ! कृषी, वाणिज्य यांची भरभराट न झाली तरी चालेल असा एखादा कालखंड असतो काय ? एकछत्री साम्राज्य नसले की सरदार, सरंजाम तर नित्य लढत राहणारच. त्यामुळे शेती, व्यापार यांचा ऱ्हास होणारच. तेव्हा त्यांच्या भरभराटीसाठी एकछत्री साम्राज्य नेहमीच अवश्य आहे. पण या कम्युनिस्ट भटजीबोवांच्या मते विशिष्ट कालीच ती आवश्यकता निर्माण होते. म्हणजे शेती, व्यापार यांचे वाटोळे झाले तरी चालेल असा कालखंड ते मनाने कल्पू शकतात. याच त्यांच्या वृत्तीला अनुसरून सिडने हूक याने, ही भयानक राक्षसी वृत्ती आहे, असे म्हटले आहे. आणि इतका दुष्टपणाचा आरोप ज्यांना करावासा वाटत नाही ते टीकाकार त्यांना आध्यात्मिक वृत्तीचे, अंधश्रद्ध किंवा भटजीबोवा म्हणतात. मॅक्स ईस्टमन हा अमेरिकन टीकाकार हेच म्हणाला: "जगाच्या विकासाची आपल्या मनातली योजना ही विश्वरचनेतच अंतर्भूत आहे आणि सृष्टीचे गूढ नियम हे आपण मानलेल्या ध्येयाच्या सिद्धतेसाठी प्रयत्नशील झाले आहेत असे मानणे हे भोळ्या धर्मश्रद्धेचे लक्षण होय."
 माणूस पूर्वकर्माने बद्ध असतो असे अध्यात्मवादी लोक मानतात. पण त्यांनीही माणूस त्रिगुणांच्या पलीकडे गेला म्हणजे कर्मबंध तुटून पडतात असे मानले आहे. म्हणजे काही दृष्टींनी तरी मानव स्वतंत्र आहे. मार्क्सने तेही स्वातंत्र्य मानवाला दिलेले नाही. अर्थसाधनांनी मागणी केली की त्याने जन्माला आलेच पाहिजे व नियत कार्य केलेच पाहिजे. मध्येच तो मेला तर दुसरा निर्माण होईल असे मार्क्सवादी म्हणतात. त्यावरून निदान मरण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे असे दिसते. आवश्यकता निर्माण होताच माणूस निर्माण होतो म्हणून महापुरुष हा केवळ तथाकथित नाममात्र महापुरुष होय असे मार्क्सचे मत होते आणि त्याच्या शास्त्रीय समाजवादातील सर्व अशास्त्रीयता यातच आहे. महापुरुष असा हुकमी निर्माण झाला असता तर जगाला आणखी काय हवे होते ? शिवछत्रपती महाराष्ट्रांत निर्माण झाले त्याच्याआधी शेकडो वर्षे बंगाल, पंजाब, सिंध येथे त्यांची आवश्यकता होती.