पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२९
मार्क्सचे भविष्यपुराण

आहे असे अनेक टीकाकार का म्हणतात तेही कळून येईल. भूमीला दुष्टांचा भार झाला म्हणजे परमात्मा अवतार घेतो असे म्हणणारे गोपाळभट वा गोविंदभट आणि अर्थविकास अडून राहताच तो पुढे चालू करून देणारा शास्त्रज्ञ वा तत्त्ववेत्ता निर्माण होतोच असे म्हणणारे मार्क्सभट वा एंगल्सभट यांच्यात कसलाही फरक नाही. अर्थविकास अडून राहिला आहे हे जाणणे व त्यावर उपाय योजून शास्त्रज्ञ वा तत्त्ववेत्ता जन्माला आणणे हे मानवेतर दैवी चित्- शक्तीचे कार्य आहे; ती चित्-शक्ती न मानणे म्हणजे जडवाद. पण ती नाही तर हे कार्य कसे होते या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे. 'ऐतिहासिक आवश्यकता- हिस्टॉरिकल नेसेसिटी- हे मार्क्सचे उत्तर आहे. याचा अर्थ इतकाच की त्याने परमेश्वराचे नाव बदलले आहे. कोणी सत्य म्हणतात, कोणी सत्यदेव म्हणतात; कोणी हिस्टॉरिकल नेसेसिटी म्हणतात. पण भटजीपणात यामुळे फरक होत नाही. एंगल्सच्या इतिहासवाचनातही तोच भटजीपणा, तीच पुराणवृत्ती दिसून येते. आवश्यकता निर्माण झाली की योग्य तो पुरुष अवतरतोच असे इतिहासाने सिद्ध होते असे तो म्हणतो ! कोणचा इतिहास त्याने वाचला होता ? स्पेन व पोलंड या देशांत १४ व्या १५ व्या शतकांत इंग्लंडसारखी प्रगती दिसूं लागली होती. पण अंध धर्मकल्पनांच्या वर्चस्वामुळे ते देश चारशे वर्षे कुजत पडले. त्या वेळी अर्थविकासाची, औद्योगिक क्रांती होण्याची तेथे आवश्यकता नव्हती काय ? १८५४ च्या आधी शेकडो कवाडे बंद करून जपान स्वस्थ पडला होता. त्या काळात यादवी चाल वर्षे होती. अर्थव्यवस्था कुजून गेली होती. तेथे विकासाची आवश्यकता नव्हती काय ? महाराष्ट्र, बंगाल, गुजराथ इ. हिंदुस्थानातील प्रांतांची इंग्रज येण्यापूर्वी सहाशेसातशे वर्षे अर्थव्यवस्था काय होती ? कृषी, वाणिज्य कोणच्या हीन स्थितीला गेले होते ? अर्थसंबंधाचा विकास करणारे पुरुष तेथे का निर्माण झाले नाहीत ? महाराष्ट्रांत स्वराज्य आले तरी व्यापार वाढला नाही. कृषिसुधारणा झाली नाही. त्या वेळी ऐतिहासिक आवश्यकता काय करीत होती ?
 अशी शेकडो उदाहरणे देता येतील. पण आपल्याला अनुकूल तेवढाच इतिहास वाचण्याची मार्क्सवाद्यांची पद्धत आहे. त्यांना त्यांचा काय उपयोग ? आपल्याकडच्या समुद्रगुप्त, चंद्रगुप्त, पुलकेशी, हर्ष यांच्या एकछत्री साम्राज्याची
 वै. सा... ९