पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२८
वैयक्तिक व सामाजिक

राजकीय, वाङ्मयीन इ. सर्व घटक महत्त्वाचे आहेतच. आर्थिक घटकांवरही त्यांचे परिणाम घडतात. आणि या दृष्टीने मानव स्वतंत्र आहे, तो स्वतःचा इतिहास स्वतःच घडवितो हे खरे; तरी आर्थिक घटक हेच निर्णायक ठरतात. माणसाचे कर्तृत्व त्यांच्या आधीन असते. (असे ते स्वतंत्र आहे !)" हे सांगून एंगल्सने पुढे ऐतिहासिक आवश्यकतेचे विवरण केले आहे. मार्क्सवादाचे मत असे की इतिहासाच्या विशिष्ट आर्थिक परिस्थितीत अर्थसाधनांच्या विकासाची आवश्यकता निर्माण होते. व्यापाराची प्रगती होईनाशी झाली की सर्व सरंजामदार नाहीसे करून टाकून एकछत्री सत्ता स्थापन होण्याची आवश्यकता निर्माण होते. आणि त्या वेळी नेपोलियन किंवा तत्सम पुरुष निर्माण होतोच. भांडवलदारांना गिरणीकारखान्यात पुरेसे मजूर पाहिजेत. पण शेतीवरच्या कुळांना शेती सोडून जाण्याचे स्वातंत्र्य नव्हते. पण भांडवलासाठी मजुरांची आवश्यकता निर्माण होताच व्यक्तिस्वातंत्र्याचा पुकारा करणारा तत्त्ववेत्ता ब्लॉक, नंतर रूसो, नंतर व्होल्टेर हे निर्माण झालेच पाहिजेत. शास्त्रज्ञ, कवी, तत्त्ववेत्ते यांना आपण महापुरुष म्हणतो. पण मार्क्सवादी लोक त्यांना तथाकथित महापुरुष म्हणतात. वाफ, वीज, यंत्र, यांची अर्थविकासाला आवश्यकता निर्माण झाली की त्यांचा शोध लावणारा शास्त्रज्ञ निर्माण झालाच पाहिजे. आणि त्याने तेच कार्य केले पाहिजे; दुसरे त्याच्या हातून होणार नाही. असेच कवी, धर्मवेत्ता, तत्त्ववेत्ता यांचे आहे. अर्थसाधनांच्या प्रगतीला शिवाजी, रामदास, क्रॉमवेल, विवेकानंद, कार्ल मार्क्स, लेनिन यांची गरज लागली की ते जन्म घेतात आणि जरूर तेच कार्य करण्याची, तत्त्वज्ञान सांगण्याची बुद्धी त्यांना होते. इतर होणार नाही. नेपोलियनचे उदाहरण सांगून एंगल्स म्हणतो की, एखादे वेळी असा नेपोलियन जन्माला येऊनही काही अपघाताने तो मरेल हे शक्य आहे. पण तो मेला तर दुसरा निश्चित निर्माण होईल व इतिहासनियत कार्य करून जाईल. इतिहासात प्रत्येक वेळी असा मनुष्य निर्माण झाला आहे असे दिसते. (एंगल्सचे स्टार्कनबर्ग यास पत्र : २५-१-१८९४).
 मार्क्सवाद अर्थेतर घटकांचा विचार किती करतो, त्यांना महत्त्व किती देतो आणि पुरुषबुद्धीला त्याच्या मते किती स्वातंत्र्य आहे हे यावरून कळून येईल आणि मार्क्सवाद स्वतःला जडवादी म्हणवीत असला तरी तो पूर्ण अध्यात्मवादी