पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२७
मार्क्सचे भविष्यपुराण

एक आणि ते सर्वस्वी नियंत्रित मानले, त्याची स्वतंत्रता अगदी अमान्य केली हे दुसरे. या गृहीतांवर त्याने आपली भविष्ये उभारली असल्यामुळे ती पूर्ण उभी राहण्याच्या आधीच कोसळू लागली.
 मार्क्सने धर्म, अनुवंश इ. इतर घटनांचा विचार केला नाही, आणि मानवी बुद्धी तो सर्वस्वी परतंत्र मानतो असे कोणी म्हटले तर त्याच्यावर अत्यंत संतापण्याची मार्क्सवादी लोकांची चाल आहे. हा मार्क्समताचा विपर्यास आहे, तुम्हाला मार्क्सवाद कळला नाही, तुम्ही भांडवलशाहीचे हुजरे आहात असे भाषण ते एकदम म्हणू लागतात. (भांडवलशाहीचे हुजरे ही मार्क्सवादातली अत्यंत लाडकी शिवी आहे. प्रत्येक कम्युनिस्टाला ती एकदा तरी म्हणावीच लागते.) पण वस्तुस्थिती तशीच आहे. याविषयी फ्रेडरिक एंगल्सने केलेले विवेचन पुढे देतो. त्यावरून वाचकांना स्वतः निर्णय करता येईल.
 "केवळ आर्थिक स्थिती हीच मानवी भवितव्याची निर्णायक आहे, असा आमच्या प्रतिपादनातून काही लोक जो भावार्थ काढतात त्याला अंशतः आम्हीच (मार्क्स व मी) जबाबदार आहो" असे एंगल्सने एके ठिकाणी म्हटले आहे. (जे. ब्लॉक याला एंगल्सचे पत्र, २१- ९- १८९०) याचे कारण देताना तो म्हणतो, "आर्थिक घटक अमान्य करणाऱ्या प्रतिपक्षीयांना आम्हांला खोडून काढावयाचे होते. त्यामुळे आम्ही त्याच्यावरच भर दिला आणि इतर घटकांचे महत्त्व सांगण्यास आम्हांला वेळ आणि संधी नेहमी मिळेच असे नाही." एंगल्सच्या या म्हणण्याचा कोणालाही विस्मय वाटेल. नवे शास्त्र निर्माण करणारे हे दोन तत्त्ववेत्ते यांना चाळीस वर्षात अर्थेतर घटकांचे महत्त्व वाटत असूनही त्यांचे विवरण करण्यास वेळ मिळाला नाही ! पण त्यांना महत्त्व वाटत नव्हते हेच खरे आहे. याच पत्रात आरंभी परंपरा, अनुवंश, धर्म इ. घटकांचे महत्त्व सांगताना दर वेळी एंगल्स म्हणतो की त्यांचे महत्त्व आहेच, ते नाकारणे हास्यास्पद आहे, पण त्यांना निर्णायक सामर्थ्य नाही. निरनिराळ्या शक्तींमुळे घटना घडतात हे खरे. पण अंतिम फल आर्थिक शक्तीनेच निर्णित व्हावयाचे आणि हे दर वेळी ! अंतिम निर्णय घडविण्याचे सामर्थ्य इतर घटकांना केव्हाही नाही. आता इतर घटक केवळ अलंकाराप्रमाणे होत असा याचा अर्थ नव्हे काय ? पण याहीपेक्षा आणखी एका पत्रात एंगल्सने जे विवरण केले आहे त्यावरून त्याच्या मनातील भाव अगदी स्पष्ट होईल. तो म्हणतो, "धार्मिक,