पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२६
वैयक्तिक व सामाजिक

ऐवजी वर दर्शविल्याप्रमाणे पुराणाचे रूप का आले त्याचा विचार करावयाचा आहे.
 ज्या ऐतिहासिक जडवादाच्या आधाराने ही भविष्ये वर्तविली जातात त्यांतच वरील अपयशाचे कारण आपणांस सापडेल. मानवी मन, मानवाची बुद्धी, प्रज्ञा ही केवळ त्याच्या काळच्या अर्थसंबंधामुळेच निश्चित होत असते, मानवी बुद्धी अर्थोत्पादन- साधनांमुळे सर्वस्वी नियंत्रित होत असते हा जो जडवादाचा सिद्धान्त तो अगदी भ्रामक आहे. मानवी मनाची घडण अनेक घटकांमुळे होत असते. अनुवंश, धर्मसंस्कार, राष्ट्रनिष्ठा, शिक्षण, भूगोल, इतर परिस्थिती, समाजाच्या व घराण्याच्या परंपरा, मानवाच्या वासना इ. अनेक कारणांनी तिचे रूप निश्चित होत असते. आणि त्यातही महत्त्वाची गोष्ट अशी की यातील कोणचे कारण कमीजास्त प्रभावी ठरेल हे सांगता येत नाही. कोणचेही ठरेल, कोणचेहि अजिबात कारणरूप होणार नाही, आणि आज धर्मसंस्कार महत्त्वाचे ठरतील तर उद्या काममोह निर्णायक ठरेल. मानवी मन स्वतंत्र आहे म्हणतात ते याच अर्थाने. वरील सर्व घटकांतून ते निर्माण होते हे खरे पण कोणच्या घटकाचे प्रमाण किती, कोणाचा प्रभाव किती आणि कोणच्या वेळी कोणच्या प्रसंगी किती हे काहीही निश्चित सांगता येत नाही. म्हणूनच या सर्व घटकांपलीकडे व्यक्तीचे 'स्व' म्हणून काही निराळे आहे आणि त्याच्या तंत्राप्रमाणे हे घडत असते असे शास्त्रज्ञ सांगतात. मानवी बुद्धी स्वतंत्र आहे याचा अर्थ असा आहे. मार्क्सने हे सर्वच अमान्य केले आहे. मानवी बुद्धी केवळ अर्थसाधनांनी नियंत्रित आहे असे तो म्हणतो. आणि ती सुद्धा इतकी की तिच्यावर याचे केव्हा कोठे व कसे परिणाम होतील हे निश्चित सांगता येते असे त्याच्या ऐतिहासिक जडवादाचे तात्पर्य आहे. अध्यात्मशास्त्रात 'बुद्धिः कर्मानुसारिणी' असे तत्त्व आहे. माणूस मागल्या जन्मीच्या कर्माने बद्ध असतो. त्याचे सर्व भवितव्य त्यामुळे ठरत असते. तो काही निराळे करू म्हणेल पण तशी बुद्धी होणे त्याच्या हातचे नाही. तीही पूर्वकर्मानी बद्ध असते, असे हे तत्त्व आहे. मार्क्सचे जडवादाचे तत्त्व असेच आहे. पूर्वकर्माऐवजी अर्थसंबंध असा शब्द घातला की झाले. म्हणजे मार्क्सने मानवी मनाच्या घडणीत अनुवंश, परंपरा इ. घटकांचा विचार केला नाही. केवळ अर्थसाधनांमुळेच ते नियंत्रित असते असे मानले हे