पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२५
मार्क्सचे भविष्यपुराण

परिपक्व होईल तेव्हा त्याचे भविष्य खरे ठरणार. तोपर्यंत नाही. आतापर्यंत वक्रीभवन झाले ते यामुळेच. ज्या परिस्थितीत मार्क्सचे भविष्य खरे ठरावयाचे ती परिस्थिती आलेलीच नाही. त्याला तो काय करणार ?
 मार्क्सचे भविष्य फसण्याचे साम्राज्यशाही हे जे कारण त्याचे अनुयायी देतात ते पाहून मोठा अचंबा वाटतो. मार्क्स ग्रंथ लिहीत असतानाच साम्राज्यशाही विस्तारत होती. इंग्रजांनी हिंदुस्थान जिंकला होता. चीनवर युरोपीयांचे आक्रमण झाले होते. याचा काहीहि उमग मार्क्सला झाला नाही ? चालू अर्थसंबंध पाहून पुढे काय घटना घडणार, युद्धे कोणात होणार, क्रांती प्रथम कोणच्या देशात होणार, हे ज्याला सांगता येते त्याला परिणत होत चाललेली भांडवलशाहीची पुढची अवस्था जी साम्राज्यशाही तिचे रूप जाणता येऊ नये, आणि त्यामुळे त्याचे भविष्य चुकावे हे त्याच्या भविष्यज्ञानाचे द्योतकच ठरते काय ? आणि ज्या ऐतिहासिक जडवादाच्या आधारावर हे सांगावयाचे त्याच्या जनकानेच इतके अज्ञान दर्शविल्यावर त्या जडवादाला अजूनही गणितासारखे सत्यशास्त्रच समजावयाचे काय ? आणि साम्राज्यशाहीचा विस्तार डोळ्याने पाहून लेनिनने जे भविष्य सांगितले त्याचे तरी काय झाले ? पहिले महायुद्ध झाले, दुसरे झाले तरी त्यातून निर्माण होणारी कामगारसत्ता अजून जन्मालाही आलेली नाही. स्टर्नबर्गच्या मते लेनिनला मार्क्सवादाचे व साम्राज्यशाहीचे मर्म कळले नव्हते. स्वकालीन युरोपातील भांडवलशाहीचे सामर्थ्य त्याला मुळीच आकळता आले नाही. कामगार कमालीचे दरिद्री झाले आहेत, स्वतःच्या संतापाग्नीत भांडवलशाहीचा बळी देण्यास ते अगदी सिद्ध आहेत असे त्याला वाटले. हा त्याचा फार मोठा भ्रम होता. त्याला सत्यज्ञान झाले असते तर त्याने रशियात 'ऑक्टोबर क्रांती' केलीच नसती. आणि स्टर्नबर्गच्या मते झाली ती समाजवादी क्रांती मुळीच नाही. पण ते काही असले तरी स्वतः स्टर्नबर्गच्या स्पष्टीकरणात तरी काय अर्थ आहे ? वर सांगितल्याप्रमाणे ती मार्गी झाल्याची कसलीही चिन्हे अजून तरी दिसत नाहीत.
 मार्क्सने वर्तविलेली भविष्ये कोणची, त्यांचे स्वरूप काय, ती कितपत सत्य ठरली आणि त्याचे अनुयायी त्याच्या सत्यासत्यतेचे समर्थन कसे करतात ते येथेवर आपण पाहिले. आता त्याच्या भविष्यकथनाला शास्त्राचे रूप येण्या-