पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२४
वैयक्तिक व सामाजिक

देशांचा आहे. ते थोडा वेळ त्याने आखून दिलेल्या मार्गापासून च्युत झाले पण अल्पकाळातच पुन्हा मार्गावर आले. हा अल्पकाळ म्हणजे शंभर वर्षाचा होय. येथे आपण लक्षात ठेवले पाहिजे की प्रारंभापासूनच हे देश वक्री चालू लागले आहेत. स्टर्नबर्गच्या पुस्तकात गेल्या शंभर वर्षांच्या इतिहासाची मीमांसा आहे. मार्क्सने भविष्य वर्तविल्याला इतकीच वर्षे झाली आहेत. म्हणजे आतापर्यंत या देशांचा अधिकांश प्रवास वक्रीच झालेला आहे, हे या पंडितांनाही मान्य आहे. पण मूळ शास्त्र चुकले असे त्यांना वाटत नाही. म्हणून त्यांच्या ग्रंथात हे वक्रीभवन का झाले ते सांगण्यावर व मार्क्स कसा चुकला नाही ते दाखविण्यावर भर असतो.
 मार्क्स लेखन करीत होता त्याच वेळी त्यांच्या मते भांडवलशाही परिपक्व झाली होती. एका बाजूला अफाट संपत्ती व दुसऱ्या बाजूला दारिद्र्याचा नरक अशी तीव्र विषमता त्याच वेळी झाली होती. यालाच भांडवलशाहीचा अंगभूत विरोध, अंतर्विरोध असे म्हणतात. आता हा अंतर्विरोध तीव्र झाला म्हणजे भांडवलशाहीचा नाश ठेवलेलाच आहे, असा मार्क्सचा सिद्धान्त आहे. असे असताना भांडवलशाहीला आणखी शंभर वर्षे जीवदान कसे मिळाले, मार्क्सने आखून दिलेल्या विनाशाच्या मार्गाने ती का गेली नाही ? उलट तिचा उत्कर्षच का झाला ? असा प्रश्न येतो.
 साम्राज्यशाही, साम्राज्यविस्तार, वसाहतवाद हे त्याचे उत्तर आहे. भांडवलशाहीचा अंत होणारच होता. पण तिने याच सुमारास साम्राज्यवादाचा आश्रय केला. वसाहती जिंकल्या. या वसाहतींतून व जित देशांतून धनाचे ओघ भांडवली देशात येऊ लागले म्हणून कामगारांना भांडवलशहा जरा बरा पगार देऊ शकले. त्यामुळे त्यांचा तीव्र संतापाग्नी जरा शमला आणि आजचे मरण उद्यावर गेले. पण इतकेच. ते टळले असे मात्र नाही. साम्राज्यशाही हे भांडवलशाहीचे परिणत रूप होय असा लेनिनने सिद्धान्त सांगितला आणि त्यामुळेच हे 'डेव्हिएशन', हे वक्रीभवन झाले असा विचार त्याने मांडला. स्टर्नबर्गने भांडवली देशांच्या मार्गच्युतीचे कारण साम्राज्यशाही हेच दिले आहे. पण त्याचे विवेचन जरा निराळे आहे. तो म्हणतो की मार्क्सने विचार मांडला तो शुद्ध भांडवली अर्थसंबंधाचा. इतर सामाजिक घटक त्याने लक्षात घेतलेच नाहीत. तेव्हा जगात प्रत्येक देशात जेव्हा पूर्ण भांडवलशाही