पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२३
मार्क्सचे भविष्यपुराण

पूर्वी भांडवली राज्ये असत. आता कम्मुनिस्ट साम्राज्ये निर्माण होऊ लागली आहेत. हंगेरी, पोलंड, बल्गेरिया, लॅटव्हिया इ. देशांवर रशियाचे साम्राज्य आहे. तिबेट, मांचूरिया इ. देशांवर चीनचे आहे. कामगारसत्ता कोठेच नाही.
 कार्ल मार्क्स व एंगल्स हे जे आद्य भाई, त्यांनी वर्तविलेल्या अनेक भविष्यांचा येथवर आपण विचार केला. त्यांच्या अनुयायांच्या मताने ती जरी खडान् खडा बरोबर आली असली तरी प्रत्यक्ष इतिहासात पाहता ती कुडमुड्या ज्योतिष्यापेक्षा काही निराळी नाहीत असे दिसते. पण याहून निराळे काही होणे शक्य नव्हते व नाही. कारण अर्थसंबंधामुळे मानवी संस्कृती निश्चित होते हे जे त्याचे आधारभूत तत्त्व तेच मुळी, भ्रामक व अशास्त्रीय आहे. ते कसे ते थोडक्यात पहावयाचे आहे. पण त्याच्याआधी या भविष्याकडे निराळ्या दृष्टिकोनातून पहाणारे मार्क्सचे अनुयायी आहेत. त्यांच्या मतांचा परामर्श घेऊन नंतर वरील विचार पाहू व समारोप करू.
 (डॉ. फ्रिट्झ् स्टर्नबर्ग या पंडिताचा 'कॅपिटॅलिझम् अँड सोशॅलिझम् ऑन् ट्रायल' या नावाचा ग्रंथ नुकताच प्रसिद्ध झाला आहे. स्विट्झरलंडमधील एक इतिहासकार हर्बर्ट लूथी याने त्याचे 'क्वेस्ट' या त्रैमासिकाच्या जानेवारी-मार्च १९५९ च्या अंकात परीक्षण करून काही विवेचन केले आहे. पुढील विवेचनाच्या अधिक अभ्यासासाठी जिज्ञासुंनी ते परीक्षण पहावे. पुढील विचार मी लूथीच्या आधारे मांडले आहेत.)
 स्टर्नबर्गसारख्या अनेक मार्क्सवादी पंडितांना मार्क्सची भविष्ये चुकली असे वाटते. पण त्यांना मार्क्सचे ऐतिहासिक जडवादाचे शास्त्र व भविष्यकथनाची पद्धत चुकली असे वाटत नाही. आणि भविष्ये चुकली हे मान्य असले तरी तसे ते म्हणत नाहीत. ते 'डेव्हिएशन' किंवा 'वक्रीभवन' असा शब्द वापरतात. शनि-मंगळादिकांच्या गती देताना पंचांगात कोठे कोठे वक्री शनिः, वक्री गुरुः, असे दिलेले असते, व नंतर काही दिवसांनी मार्गी शनिः, मार्गी गुरु: असे म्हटलेले असते. याचा अर्थ असा की शनि- गुरू यांचे मार्ग निश्चित ठरलेले आहेत. पण मध्येच ते हे मार्ग टाकून जरा वाकडे जातात. पण काही झाले तरी पुन्हा मार्गावर येतातच. त्याचे हे जे अल्पकाळ मार्ग सोडून जाणे त्याला वक्रीभवन असे म्हणतात. तसाच प्रकार मार्क्सने ज्यांची गती वर्तविली त्या