पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२२
वैयक्तिक व सामाजिक

वादी लोकांनी दिलेली कारणमीमांसा. दोन राष्ट्रे आपापली साम्राज्ये वाढविण्याची खटपट करणार आणि त्यातून संघर्ष निर्माण होऊन युद्ध होणार अशी, मार्क्सवादाची कारणमीमांसा आहे. तीअन्वये अमेरिका व ब्रिटन यांच्यात युद्ध अटळ आहे असे अनेक कम्युनिस्टांनी भविष्य सांगितले होते. पण ते अजूनही घडलेले नाही व पुढे घडण्याची सध्या तरी चिन्हे नाहीत. आणि त्या कारणाने पाहिले तर जर्मनी व रशिया यांच्यात युद्ध मुळीच व्हावयास नको होते. कारण या दोन देशांच्या साम्राज्यविस्ताराचा संघर्ष कोठे आलाच नव्हता. इतकेच नव्हे तर काही पंडितांच्या मते जर्मनी व ब्रिटन यांचाही साम्राज्यासाठी संघर्ष येण्याचे कारण नव्हते. कारण १९१४ साली जर्मनी अतिशय भरभराटीच्या अवस्थेत होता. आणि त्याला विकण्यास पुष्कळ क्षेत्र मोकळे होते. व्यापाराचा व भांडवलशाहीचा विस्तार होत नाही, माल खपत नाही, धन मिळत नाही, त्यामुळे दारिद्र्य येत चालले आहे, कुचंबणा झाली आहे असा प्रसंग जर्मनीवर १९१४ साली मुळीच आलेला नव्हता. दुसरे असे की त्या वेळी फ्रान्स, जपान, ही राष्ट्रेही भांडवली क्षेत्रात येत होती. ब्रिटनशी साम्राज्यासाठी म्हणजे बाजारपेठेसाठी संघर्ष यावयाचा तर तो त्यांचा येणे अवश्य होते. पण ते तर त्या वेळी ब्रिटनच्या बाजूचे दोस्त होते. म्हणजे आर्थिक परिस्थिति किंवा अर्थसंबंध हा जो भविष्याचा मूलाधार त्याअन्वयेही भविष्ये खरी होतच नाहीत. पण मार्क्सच्या या भविष्याचे खरे दारिद्र्य पुढेच आहे. युद्ध होईल हा त्यातला पूर्वार्ध आहे. त्या युद्धाचा जो परिणाम तो भविष्यातला महत्त्वाचा भाग होय. तो परिणाम म्हणजे भांडवलशाहीचा नाश, कामगारांचा विजय व कामगारांच्या दंडसत्तेची प्रस्थापना. यांचा तर कोठे मागमूसही दिसत नाही. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, जपान, इटली, तुर्कस्थान, इजिप्त, इराक, इराण, सिरिया, या अनेक देशांत पहिल्या व दुसऱ्या महायुद्धात भयानक उलथापालथी झाल्या पण कामगारांची दंडसत्ता कोठेही प्रस्थापित झाली नाही. रशियात तशी झाली असे ४-५ वर्षांपूर्वीपर्यंत कम्युनिस्ट म्हणत. पण स्टॅलिन हा केवळ सुलतान होता असे आता क्रुश्चेव्हनेच सांगून टाकले आहे. क्रुश्चेव्ह्सारखे लोकही त्याच्यापुढे लाचार झाले होते असे तेच म्हणतात, मग कामगारांचे काय झाले असेल ते सांगणे नकोच. तेव्हा रशियात कामगारसत्ता तर नाहीच पण अत्यंत भयंकर अशी सुलतानशाही व साम्राज्यशाही आहे.