पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२१
मार्क्सचे भविष्यपुराण

पण मार्क्सच्या या शापवाणीतून हा वर्ग सहीसलामत सुटला एवढेच नव्हे तर ज्या काळात त्याचा मार्क्सवादाच्या मते नष्टांश व्हावयाचा होता त्याच काळात तो अत्यंत प्रभावी झाला, व जगातल्या अधिराज्याची सूत्रे त्याने आपल्या हाती घेतली. १८५० ते १९५० या शतकाचा इतिहास पाहिला तर पाश्चात्त्य देशातच नव्हे तर हिंदुस्थान, चीन, जपान, तुर्कस्थान, इजिप्त, इ. मागासलेल्या देशांतसुद्धा विद्याजीवी मध्यमवर्गानेच सर्वत्र विज्ञानाचे, लोकशाहीचे व राष्ट्रनिष्ठेचे युग निर्माण केले आहे असे दिसून येईल. रानडे, विष्णुशास्त्री, आगरकर, टिळक, रवींद्रनाथ, जगदीशचंद्र, विवेकानंद, बिपिनचंद्र, अरविंद, लाला लजपतराय, महात्माजी, विठ्ठलभाई, वल्लभभाई हे सर्व विद्याजीवी पुरुष होते. अशीच परंपरा इतर देशांत गेल्या शतकात निर्माण झाली आणि तिने आपल्या देशात वर्चस्व प्रस्थापित केले. धन हे जसे एक सामर्थ्य आहे तसेच विद्या व चारित्र्य हेही एक सामर्थ्य आहे. ते धनशक्तीवरही मात करू शकते हे इतिहासाने अनेक वेळा दाखविले आहे. मार्क्सला व कम्युनिस्टांना हे जाणण्याची कुवत नाही, कारण अर्थशक्तीवाचून दुसरी स्वतंत्र बौद्धिक शक्ती असूच शकत नाही या तत्त्वाचे ते गुलाम आहेत. म्हणूनच मार्क्सची भविष्ये फलज्योतिषाइतकीसुद्धा खरी ठरली नाहीत. मार्क्स लिहीत होता, त्याच वेळी मागासलेल्या जगात जपान, चीन, हिंदुस्थान या देशांत-पाश्चात्त्य विद्येचा प्रसार होऊन हा विद्याजीवी वर्ग निर्माण होत होता, इतकेच नव्हे तर आपला प्रभाव दाखवू लागला होता. पण भविष्य जाणणाऱ्या मार्क्सला हे वर्तमानही कळले नाही !
 मार्क्सच्या सर्व भविष्यात विशेष कौतुक एका भविष्याचे होते. ते म्हणजे पहिल्या महायुद्धाविषयीचे त्याचे भविष्य. १८७० साली, पुढे (कधी ?) जर्मनी व रशिया यांच्यात युद्ध होईल, असे त्याने एका मित्राला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. १८८८ साली एंगल्सनेही जागतिक महायुद्धाचे भविष्य वर्तविले होते.
 हे पहिल्या जागतिक महायुद्धाचे भविष्य हा शुद्ध भोंगळपणा आहे. पहिली गोष्ट अशी की मार्क्स व एंगल्स हे आपल्या भविष्याचा काळ कधीच देत नाहीत. गणितशास्त्राइतक्या अचूक असणाऱ्या शास्त्रात काळ कधीच सांगितलेला नसतो लक्षात ठेवले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे या युद्धाची मार्क्स-