पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२०
वैयक्तिक व सामाजिक

झालेला कामगार असे दोनच वर्ग राहतील हे मार्क्सचे भविष्य तर कोठल्याच देशात खरे झाले नाही. ज्या दिवशी त्याने ते वर्तविले त्या दिवसापासूनच ते खोटे ठरू लागले. किंबहुना त्याच्याआधीच कालप्रवाह बदलू लागला होता. मार्क्सला त्याचे ज्ञान झाले नाही एवढेच.
 मध्यमवर्ग व राष्ट्रनिष्ठा यांच्याविषयीचा भविष्याच्या असाच प्रकार झाला. राष्ट्रनिष्ठा ही धर्माप्रमाणेच अफू आहे असे मार्क्सचे मत होते. धर्माप्रमाणेच तेही तत्त्वज्ञान कामगारांना झुलविण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी निर्माण केले आहे, कामगारांना मातृभूमी, पितृभूमी, यांचे सोयरसुतक काही नाही, कामगार हा जगाचा नागरिक आहे, जगातील सर्व कामगार एक आहेत, जाती, धर्मपंथ, राष्ट्र हे भेद ते मानीत नाहीत, असे मार्क्स म्हणत असे. त्याचे अनुयायी अजूनही म्हणतात. (त्यांना तसे म्हणत राहिलेच पाहिजे.) राष्ट्रनिष्ठा ही कामगारांना त्याज्य असल्यामुळेच मार्क्सने त्यांची जी संस्था स्थापिली तिचे नाव 'फर्स्ट इंटरनॅशनल'- 'आंतरराष्ट्रीय सभा' असे ठेविले. ती मोडल्यावर १८८९ साली दुसरी स्थापन झाली तिचे नावहि तसेच 'दुसरी आंतरराष्ट्रीय सभा' असे ठेविले आणि अत्यंत आश्चर्याची गोष्ट अशी की क्रांतीनंतर रशिया पक्का राष्ट्रवादी झाल्यानंतर एकराष्ट्रीय समाजवादाची स्टॅलिनने घोषणा केल्यानंतर तिसऱ्या सभेचे नावही 'थर्ड इंटरनॅशनल' असेच राहिले. रशियाच्या दृष्टीने ते युक्तच होते. कारण जो सोव्हिएट रशियाशी एकनिष्ठ तोच खरा आंतरराष्ट्रवादी अशी व्हिशिन्स्किसारखे कम्युनिस्ट व्याख्या करतात. तरी जगातल्या सर्व देशातले कामगारनेते- हिंदुस्थानातले सुद्धा- अगदी वारकऱ्याच्या भक्तिभावाने या सोव्हिएट रशियांकित, रशियानिष्ठ अशा आंतरराष्ट्रीय सभेला उपस्थित राहतात. असो, एवढे खरे की राष्ट्र ही कल्पनाच पुढच्या काळात नष्ट होईल हे मार्क्सचे भविष्य क्रांतीच्या भविष्याइतकेच खोटे ठरले, हे पुन्हा एकदा सोव्हिएट रशियाने सिद्ध केले.
 विद्याजीवी किंवा बुद्धिजीवी मध्यमवर्गावर मार्क्सवादाचा फार कटाक्ष. हे लोक म्हणजे कामगारक्रांतीचे कट्टे शत्रू, भांडवलदारांचे गुलाम आणि प्रस्थापित सरकारचे लाचार दास होत, असे कम्युनिस्टांनी अनेक वेळा म्हटले आहे. भांडवलदार व कामगार यांहून इतर सर्व वर्ग नष्ट होणार असे मार्क्सचे भविष्य असल्याचे वर सांगितलेच आहे. अर्थात् मध्यमवर्गही नष्ट होणारच !