पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११९
मार्क्सचे भविष्यपुराण

 क्रांतीचे स्वरूप, तिचा व्याप व तिचा कमीअधिक वेळ यांविषयीच्या मार्क्सच्या भविष्याचा विचार झाला. दुसरे भविष्य वर्गभेदाच्या तीव्रतेविषयीचे. मार्क्सचे मत असे होते की पश्चिम युरोपीय देशांत भांडवलशाही परिपक्व झाली आहे. तेथे उत्तरोत्तर संपत्तीची वाटणी अत्यंत विषम होत जाणार. कामगारवर्ग कमालीचा दरिद्री होणार आणि सर्व संपत्ती भांडवलदारांच्या हाती एकवटणार. आणि यातूनच मग भडका उडून कामगार लोक भांडवलशाही नष्ट करून कामगारसत्ता प्रस्थापित करणार. जगाच्या सुदैवाने हेही भविष्य असेच लटके झाले. संपत्तीची विषम वाटणी होत आहे असे पाहताच मार्क्सच्या डोळ्यादेखत बिस्मार्क, डिझरायली या नेत्यांनी कामगारहिताचे कायदे करून तिचा निचरा करण्यास प्रारंभ केला. १८८० च्या सुमारालाच हा उपक्रम झाला होता. त्याच्याआधीच जॉईंट स्टॉक कंपन्यांची पद्धत सुरू होऊन गिरण्या- कारखान्यांवरची धनिक सत्ता नष्ट होण्यास प्रारंभ होऊन धनामध्ये मध्यमवर्ग वाटेकरी होऊ लागला होता. त्या वेळचे लेसे फेअरचे म्हणजे अर्थक्षेत्रातील अनिर्बंधतेचे तत्त्वज्ञान नष्ट होऊन सरकारने अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवले पाहिजे, हे तत्त्वज्ञान दृढमूल होऊ लागले होते. या सर्व प्रेरणांमुळे कामगारवर्गाला हळूहळू सुस्थिती प्राप्त होऊ लागली, धनिकांच्या संपत्तीचा निचरा होऊ लागला आणि मार्क्सची भविष्यवाणी खोटी ठरू लागली. अमेरिका, ब्रिटन, पश्चिम जर्मनी येथे मार्क्समतान्वये समाजवादी क्रांती मुळीच झालेली नाही. रशियात ती झालेली आहे. तरी भांडवली देशातील कामगारांचे राहणीचे मान सोव्हिएट कामगारांच्यापेक्षा शतपटीने श्रेष्ठ आहे. या प्रगत देशांची गोष्ट सोडून दिली तरी मार्क्सच्या काळापासून पुढच्या काळात मार्क्स म्हणाला त्याप्रमाणे वर्गभेदाची तीव्रता कोणच्याच देशात वाढली नाही. नियंत्रणाचे तत्त्व सर्वच देशांनी मान्य केले होते. आणि कालांतराने कामगारवर्ग संघटित झाल्यामुळे त्याला भांडवली व्यवस्थेतच थोडे बरे दिवस येऊ लागले. पाश्चात्त्य देशांप्रमाणे त्याला सुस्थिती आली असे नव्हे. पण कालप्रवाह बदलून गेला हे निश्चित. समाजात वर्ग नष्ट होतील, मध्यमवर्ग समूळ नष्ट होईल, लहान कारखानदार हे भिकेस लागतील व शेवटी मजूर होतील आणि शेवटी एका बाजूला अत्यंत धनाढ्य, कमालीचा संपन्न असा भांडवलदार व दुसऱ्या बाजूला अन्नवस्त्रालाही महाग