पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११८
वैयक्तिक व सामाजिक

साली रशियात क्रांती होऊन लेनिन सत्ताधारी झाला. आपण समाजवादी क्रांती केली आहे अशी त्याची श्रद्धा होती आणि अजूनही त्याचा वरील भविष्याच्या उत्तरार्धावर विश्वास होता. त्यामुळे, रशियन क्रांती हा केवळ आरंभ आहे, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका येथे आता अशीच क्रांती होत जाणार, तशी न झाली तर आपला सर्वनाश होईल, आपल्या क्रांतीचा घात होईल, असे तो नित्य म्हणत असे. क्रांतीच्या अपेक्षेने त्याने आपले हस्तक या वरील देशांत पाठविले होते. पण कोठे काहीच झाले नाही. आणि मग हळूहळू ती आशा सोडून देऊन 'कम्युनिस्ट क्रांती एकराष्ट्रीय असू शकते' अशा घोषणा रशियन मार्क्सवादी करू लागले.
 लेनिन हा भविष्यज्ञानात मार्क्सइतकाच निपुण होता असे म्हणतात. १९१७ च्या आधी पंचवीस वर्षे ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका, या देशांतील अर्थोत्पादन साधने, तेथील भांडवलशाही, कामगारवर्ग, तेथील पक्षोपपक्ष, इतर परिस्थिती यांचा तो अभ्यास करीत होता. तरी १९१७ साली सुद्धा त्याला त्यांच्याविषयी, त्या समाजाच्या पुढील दोन-तीन वर्षांतल्या भवितव्याविषयी काहीही कळू शकले नाही. तेथे समाजवादी क्रांती होणार असेच तो म्हणत होता. पण जर्मनी, फ्रान्समध्ये पुढील काळात झाले ते अगदीच उलट झाले !
 टाकचाव्हचे मत व त्यावरील एंगल्सची टीका वर दिली आहे. ती आणि लेनिनचे हे भविष्यज्ञान यांवरून समाजवादाचा ओनामा कोणाला कळला आहे हेच कळेनासे होते. एंगल्सच्या मते टाकचाव्हला तो कळलेला नव्हता. पण क्रांतीने टाकचाव्हला तो कळला असल्याचे सिद्ध केले. लेनिननेही ते मान्य केले. पण पुढल्या भविष्यज्ञानावरून त्याच्याबद्दलही तीच शंका येते. स्टॅलिनला खरे भविष्यज्ञान असते तर हिटलरचा जर्मनी पुढे आपल्यावर उलटणार आहे एवढे त्याच्या ध्यानात आले असते. कारण कोणचा पक्ष कोणच्या बाजूला जाईल, कोणाची काय तत्त्वनिष्ठा राहील हा तपशील ग्रहगोलांच्या गतीप्रमाणेच निश्चित सांगता येतो असे मार्क्समत आहे. तेव्हा स्टॅलिनचे भविष्यज्ञान व समाजवादाचे ज्ञान शंकास्पदच दिसते. आणि आजच्या रशियाच्या सत्ताधाऱ्यांना ते मान्य आहेच. या सगळ्यामुळे मोठी पंचाईत होते. तूर्त आपण मार्क्स व एंगल्स यांना समाजवादातले काही कळत होते, असे धरून पुढे जाऊ.