पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११७
मार्क्सचे भविष्यपुराण

भविष्य कसे तंतोतंत बरोबर आले हे स्पष्ट करणारे अनेक कम्युनिस्ट आढळतात. त्यांचे लेखही प्रसिद्ध आहेत. (रशियन राज्यक्रांति- पां. वा. गाडगीळ- पृ. २६० पहा.) पण त्याचा विचार न करता एंगल्सच्या या महत्त्वाच्या भविष्याचा विचार प्रथम आपणांस पुरा केला पाहिजे.
 टाकचाव्ह नावाच्या एका पंडिताचे मत असे होते की रशियातच क्रांती प्रथम होणे जास्त शक्य आहे. जर्मन कामगारांसमोर भाषण करताना तो म्हणाला की, 'फ्रेड्रिक एंगल्स याला रशियाविषयी काही माहिती नाही. त्याला काही कळत नाही. रशियात कामगार नाहीत हे खरे पण तसे भांडवलदारही नाहीत. तेव्हा तेथील लढा सोपा आहे. इ.' यावर आपल्या एका लेखात कडक टीका करून एंगल्सने सांगितले की 'या टाकचॉव्हला सोशॅलिझम्चा ओनामा सुद्धा कळत नाही.' आणि नंतर त्या लेखात एंगल्सने रशिया हा मागासलेला आहे, समाजवादी क्रांती होण्यास भांडवलशाहीची परिणती झालेली असणे आवश्यक असते, तशी रशियात नाही. पाश्चात्त्य राष्ट्रांआधी रशियात क्रांती होईल. पण ती समाजवादी क्रांती असणार नाही, अशा तऱ्हेने विवेचन केले आहे. (ऑन सोशल रिलेशन्स इन् रशिया, सन १८७५)
 रशियात १९१७ साली जी क्रांती झाली ती समाजवादी क्रांतीच होय असे बहुतेक सर्व कम्युनिस्ट पंडितांचे मत आहे. मार्क्सवचन श्रुतीप्रमाणे मानणारे लेनिनचे काही सहकारी समाजवादी क्रांती रशियात होणे शक्य नाही, असे १९१७ साली झारशाही कोलमडून पडल्यावरही म्हणत होते. स्टॅलिन त्यातच होता. पण लेनिनने त्या सर्वांना खोडून काढले, व मार्क्समताच्या आधारेच रशियातील समाजवादी क्रांती घडवून आणली. तेव्हा मार्क्स- एंगल्सचे समाजवादी क्रांतिविषयीचे भविष्य कितपत खरे झाले ते यावरून स्पष्ट होईल. रशियातील क्रांती कोणच्या जातीची आहे याविषयी जरी वाद असला तरी समाजवादी क्रांती ब्रिटन, अमेरिका इ. भांडवली देशांत प्रथम होईल हे भविष्य फसले हे मान्य केलेच पाहिजे.
 कम्युनिस्ट (समाजवादी) क्रांती ही जागतिक क्रांतीच होणार. ती एकराष्ट्रीय असणार नाही हा वरील भविष्याचा उत्तरार्ध आहे तोही खरा ठरला नाही हे उघडच आहे. पण त्याविषयी थोडे आणखी सांगितले पाहिजे. १९१७