पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११६
वैयक्तिक व सामाजिक

भविष्य कम्युनिस्ट पंडितांनी अगदी सूक्ष्म अभ्यासानेच वर्तविलेले असणार. आणि म्हणून त्याचे महत्त्वहि फार. यामुळेच त्याचा प्रथम विचार करू.
 भांडवलशाही ज्या देशात परिपक्व दशेस आली आहे त्याच देशांत प्रथम कम्युनिस्ट क्रांती होणार आणि अशा भांडवलशाही देशांचे अर्थव्यवहार परस्परात अत्यंत गुंतलेले असल्यामुळे अशा सर्व देशात ती क्रांती एकदमच होणार हे निश्चित, असे 'प्रिन्सिपल्स ऑफ कम्युनिझम्' या संवादरूप लेखात एंगल्सने म्हटले आहे. आणि तपशिलात शिरून त्याने असेही वर्तविले होते की कम्युनिस्ट क्रांती राष्ट्रीय म्हणजे एका राष्ट्रापुरती मर्यादित क्रांती होणार नाही. ती प्रगत भांडवली देशात म्हणजे ग्रेट ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स व जर्मनी या देशांत प्रथम एकदम होईल. त्यातही जेथे औद्योगिक प्रगती सर्वात जास्त, धनोत्पादन जेथे पराकोटीला गेलेले तेथे ती प्रथम होईल. या दृष्टीने ब्रिटनमध्ये ती सर्वात जास्त वेगाने होईल व जर्मनीत अगदी मंदगतीने होईल, असे त्याने लिहून ठेविले होते.
 मार्क्सवादाचे दुर्दैव असे की कम्युनिस्ट क्रांती ही यांपैकी कोणच्याहि प्रगत देशांत न होता औद्योगिक दृष्टीने अत्यंत मागासलेला असा देश जो रशिया तेथे झाली. सावित्रीचा पती सत्यवान् याचे प्राणहरण करताना यमाने चूकभूल केली. याचे कारण मोरोपंत असे देतात की "जे ब्रह्मलिखित बरे न वाची ते." यमाने ब्रह्मदेवाने सत्यवानाचा लिहिलेला ललाटलेख नीट वाचला नाही. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात क्रांतिदेवतेने अशीच चूकभूल केली. एंगल्सचा लेख तिने नीट वाचला नाही. तिने पूर्ण मागासलेल्या देशांत अवतार घेतला आणि पुन्हा एकाच देशापुरती ती मर्यादित राहिली. स्टॅलिनला १९२६ साली कम्युनिस्ट क्रांती ही जगव्यापक नसून एकराष्ट्रमर्यादितच आहे अशी घोषणा करावी लागली. म्हणजे तिने एंगल्सची दोन्ही भविष्ये सपशेल चुकविली. अर्थात् फलज्योतिषशास्त्रात ज्याप्रमाणे भविष्य सपशेल चुकलेले असताना ते पूर्ण बरोबर कसे आहे हे सांगणारे ज्योतिषी असतात तसेच ऐतिहासिक जडवाद या शास्त्रातही आहेत. बढती सांगितलेली असताना बडतर्फी झाली तरी ती बडतर्फी हीच कशी बढती होय हे स्पष्ट करणारे ज्योतिषी सर्वत्र आढळतात; त्याचप्रमाणे भांडवली दृष्टीने पूर्ण मागासलेल्या रशियात क्रांती झाली तरी भांडवलपरिपक्व देशांत ती प्रथम होणार हे मार्क्सवादाचे