पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११५
मार्क्सचे भविष्यपुराण

स्वरूप प्राप्त होते. माणसाच्या विवेकबुद्धीने परिस्थिती ठरत नसून परिस्थितीमुळेच माणसाच्या विवेकबुद्धीचे रूप निश्चित होत असते. (मार्क्स- क्रिटिक ऑफ पोलिटिकल इकॉनमी)
 सामाजिक व राजकीय क्रांतीची अंतिम कारणे माणसाच्या कर्तृत्वात नसून उत्पादन व विनिमय यांच्या साधनांत जो बदल होतो त्यात ती सापडतात. (एंगल्स- शास्त्रीय समाजवाद)
 मानवाच्या विचारांच्या प्रवाहाची दिशा भोवतालच्या जड परिस्थितीमुळे निश्चित होते. धर्म, कायदा, शासनसंस्था, भिन्न भिन्न गटांतील मानवांचा दर्जा यांचे स्वरूप त्या काळच्या उत्पादनसाधनांनीच निश्चित होत असते. (एंगल्स- मार्क्स मृत्यूनंतरचे भाषण.)
 या वचनांवरून ज्योतिषशास्त्रातील शनिमंगळांइतक्याच सामर्थ्याने व तितक्याच सूक्ष्मपणे नांगर, माग, मासे पकडण्याचे जाळे, गिरण्या- कारखाने, बँका ही अर्थसाधनेहि मानवी जीवनाचे नियंत्रण करतात असे मार्क्सवादी मानतात असे दिसून येईल. नाचणाऱ्या बायका नाचताना काही हातवारे करतात. ते सुद्धा वाटेल तसे होत नाहीत. गाजरे, बटाटे, मुळे इ. भाज्या जमिनीतून उपटताना आणि झाडावरची फळे तोडताना म्हणजे अन्नधान्य प्राप्त करून घेताना जसे कामकरी बायकांचे हात होतात तसेच त्या वेळच्या नृत्यात हातवारे होणार. अन्यप्रकारे होणे शक्य नाही असे प्लॅखेनॉव्ह हा रशियातील लेनिन- स्टॅलिनादि मार्क्सवाद्यांचा परात्पर गुरू म्हणतो. मानवी जीवनावर अर्थसंबंधाचे इतके सूक्ष्म नियंत्रण असताना भविष्ये सांगता येऊ नयेत ही खरोखरच नामुष्कीची गोष्ट आहे. मार्क्सने अर्थशास्त्रज्ञांची ही नामुष्की दूर करून त्यांचे लज्जारक्षण केले, यासाठी त्यांनी त्याला शतशः धन्यवाद दिले पाहिजेत.
 फल- ज्योतिषशास्त्राच्या तोडीचे किंवा त्यापेक्षाही जास्त सुनिश्चित असे जे जगप्रसिद्ध शास्त्र मार्क्सने निर्माण केले त्याच्या आधाराने मार्क्सने व त्याच्या अनुयायांनी भविष्ये तरी कोणची सांगितली आणि त्यांपैकी खरी किती झाली ते आता आपणास पहावयाचे आहे.
 पहिले भविष्य अर्थातच कम्युनिस्ट क्रांतिविषयीचे. कम्युनिस्ट क्रांती हा मार्क्सवादाचा आत्मा. त्या पंथाचे ते सर्वात मोठे वैभव ! तेव्हा त्याविषयीचे