पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११४
वैयक्तिक व सामाजिक

आहेत. अर्थसाधनांचा विकास होण्यास व्यक्तिस्वातंत्र्य अनुकूल असेल तर ते प्रस्थापित होईल. नसेल तर होणार नाही. आणि झाल्यास टिकणार नाही. एकोणिसाव्या शतकात कारखानदारी व भांडवलशाही यांच्या वाढीला व्यक्तिस्वातंत्र्य अवश्य होते. लगेच पाश्चात्त्य देशांत त्याचा पुरस्कार करणारे तत्त्ववेत्ते निर्माण झाले. त्याचा प्रसार झाला. ते दृढमूल झाले. त्याआधी ते होणे शक्यच नव्हते. त्याआधी शेतीच्या विकासाला, सरंजामदारीला दासपद्धतीच अनुकूल होती. म्हणून ती अमलात आली, टिकून राहिली आणि तिचा उपदेश करणारी धर्मतत्त्वे साधुसंत सांगत राहिले. उपनिषत्काली संन्यास, वैराग्य यांचा उदय का झाला ? विश्वाच्या मूलकारणांचे चिंतन केल्यावर मोक्षसाधनाला संन्यास अवश्य असे, ऋषींना वाटले म्हणून त्यांनी तसा उपदेश केला, हे खोटे. गृहस्थधर्म, यज्ञधर्म झेपणे कठिण व्हावे अशी आर्थिक परिस्थिति निर्माण झाली म्हणून ऋषींना संन्यासधर्माचा उपदेश करण्याची बुद्धी झाली, हे खरे. म्हणजे तत्त्वज्ञानातून, मानवी विचारांमुळे परिस्थिती बदलते असे नसून परिस्थितिमुळे मानवी विचार, बुद्धी, तत्त्वज्ञान, संस्कृती ही बदलतात, निर्माण होतात, असे हे मत आहे. आणि ही परिस्थिती म्हणजे आर्थिक परिस्थिती. धनोत्पादनसाधने, विनिमयपद्धती, रस्ते, वाहने, त्या साधनांतून निर्माण झालेले वर्ग, त्यांचे परस्परसंबंध हे सर्व आर्थिक परिस्थितीत समाविष्ट होते. (यापुढे अर्थसंबंध या शब्दाने आपण त्याचा निर्देश करू.) या परिस्थितीच्या नियंत्रणांत सर्व घडामोडी असल्यामुळे तिचे ज्ञान असणाऱ्या मनुष्याला भविष्ये सांगता येतील हे उघडच आहे. शनि-मंगळाच्या नियंत्रणात मानव आहे असे ज्यांना वाटते ते त्यांच्या स्थितिगतीचा अभ्यास करतात आणि भविष्ये वर्तवितात. अर्थसबंध मानवाचे नियंत्रण करतात असे मत असणारे मार्क्सवादी त्याच्या अभ्यासाच्या आधारे भविष्य सांगतात.
 याविषयीचे आपले सिद्धान्त अनेक ठिकाणी मार्क्सवादी पंडितांनी सांगितलेले आहेत. प्रत्येक युगात उत्पादन व विनिमय यांच्या ज्या पद्धती अस्तित्वात असतात त्यांच्यामुळे जी अनिवार्य अशी समाजरचना झालेली असते तिच्या पायावरच सर्व राजकीय व बौद्धिक इतिहास उभा असतो, व या साधनांच्या आधारेच त्याचे रहस्य उकलता येते. (कम्युनिस्ट मॅनिफेस्टो).
 राजकीय, सामाजिक व धार्मिक जीवनाला उत्पादनसाधनांमुळेच विशिष्ट