पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०६
वैयक्तिक व सामाजिक

हिटलरच्या दंडसत्तेच्या आहारी गेले. भांडवलाबरोबर व्यक्तिस्वातंत्र्य उदयास येते, कारण कारखानदारांना मजुरांचा पुरवठा होणे अवश्य असते, असा एक सिद्धान्त मार्क्सवादाने ठोकून दिला आहे. जर्मनी, जपान, इटली येथला इतिहास मार्क्सचा हा सिद्धान्त मान्य करीत नाही. जपानमध्ये १९१२ नंतर सर्व सत्ता भांडवलदारांनी काबीज केली. पण व्यक्तिस्वातंत्र्य त्यांनी कधी क्षितिजावरही येऊ दिले नाही. तरी त्यांना मजुरांचा तुटवडा पडला नाही. आर्थिक स्थितीवर गुण अवलंबून असता, भांडवलदार, म्हणजे अमक्या वृत्तीचा, अमक्या गुणाचा, असा त्याचा वर्गगुण ठरलेला असता, तर सर्व देशांतले भांडवलदार सारख्या प्रवृत्तीचे दिसले असते. पण तसे मुळीच दिसत नाही. कोणी रूझवेल्ट, चर्चिल यांचे नेतृत्व पतकरून राष्ट्रनिष्ठा, व्यक्तिस्वातंत्र्य, आर्थिक समता ही तत्त्वे मान्य करतात तर कोणी हिटलर, मुसोलिनी यांच्यापुढे नमून व्यक्तिस्वातंत्र्य, समता, यांचा खुशाल बळी देतात. त्यांचा स्वार्थ हा पराकोटीला गेलेला असतो. त्यासाठी ते वाटेल ती अनन्वित कृत्ये करतात हे खरे आहे. पण हे लक्षण कोणच्या वर्गाला लागू नाही ? चीन, रशिया, येथील सत्ताधारी कामगारांनी कोणची अनन्वित कृत्ये, कोणचे अत्याचार करावयाचे ठेवले आहेत ? थोडी शक्ती आली, थोडे रान मोकळे मिळाले की कामगार, विद्याजीवी, शेतकरी, व्यापारी, हे वर्ग वाटेल ते अत्याचार करण्यास प्रवृत्त होतात हे दरघडीला दिसून येत असतांना भांडवलदारांनाच त्या गुणाची मक्तेदारी देण्यात काय अर्थ आहे ? हाती सत्ता आहे की नाही येवढाच प्रश्न असतो. धनामुळे ती सुलभ असते येवढेच. पण संघशक्तीनेही ती मिळू शकते. आणि संघशक्तीने ती बुद्धिजीवी, कामगार, शेतकरी यांना कोणालाही मिळू शकते. ती मिळताच हेही वर्ग भांडवलदारांप्रमाणेच तिचा क्रूर वापर करतात. आज केरळमध्ये कम्युनिस्टांचे राज्य आहे, पण कामगार, विद्यार्थी यांवर गोळीबार, टाटा सारख्यांशी सहकार्य, हे तेथे चालू आहे.
 पेटी बूर्झ्वा वर्गाविषयी मार्क्सची मते याच प्रकारची आहेत. जातिगुणाप्रमाणेच यांच्या वर्गगुणाविषयी तो ठाम सिद्धान्त सांगतो. दुकानदार, लहान व्यापारी, कारागीर इत्यादि व्यवसाय करणाऱ्यांचा त्याने या वर्गात समावेश केला आहे. मार्क्सच्या मते हा वर्ग अत्यंत दगलबाज आहे. कामगारांशी सहकार्य करण्यासाठी हा हात पुढे करील. पण स्वार्थ साधताच तो फुटून निघेल.