पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०७
मार्क्सप्रणीत चातुर्वर्ण्य

याच्याशी कामगारांनी कधीच ऐक्य करता कामा नये. हा वर्ग कधी कामगारांचे हितही करतो. पण कामगारांची क्रांतिवृत्ती नष्ट व्हावी या उद्देशाने दिलेली ही लाच आहे असे समजावे. हा मध्यम व्यापारीवर्ग नेहमी अस्थिर, चंचल दोन्ही डगरीवर हात ठेवणारा, अनिश्चित मनाचा असा असतो. आणीबाणीच्या वेळी हा भांडवली सत्तेला मिळणारच म्हणून कामगारांनी यावर कधीच विसंबून राहू नये. (१.१०१, १०३, ५८४) हा वर्ग हळूहळू नाहीसा होऊन शेवटी कामगारवर्गात त्याचे रूपांतर होणार असे याच्याविषयी मार्क्सने भविष्य वर्तविले होते. (१. ४०). मार्क्सच्या इतर भविष्यांची जी गत झाली तीच याचीही झाली.
 चवदाव्या-पंधराव्या शतकात युरोपात विद्येचे पुनरुज्जीवन होऊन मानवाच्या व्यक्तित्वाला काही प्रतिष्ठा प्राप्त झाली. पुढे व्यक्तिस्वातंत्र्य, समता, लोकसत्ता इत्यादि थोर तत्त्वांचा प्रसार होऊन व्यक्तित्व हे अंतिम मूल्य आहे हे सर्वत्र मान्य होऊन अखिल जगतातील मानव त्या दिशेने हळूहळू वाटचाल करू लागला. पण याच सुमारास मार्क्सवाद निर्माण होऊन त्याने या मानवी मूल्यांची होळी केली. ब्राह्मण, मराठा, वाणी, कुंभार, परीट, तेली अशा जातिवाचक नावाने पूर्वी माणसाला ओळखीत. तोच प्रकार मार्क्सवादाने पुन्हा सुरू केला. हा भांडवलदार, हा दुकानदार, हा कामगार, हा शेतकरी, हा शेतमजूर या अभिधानांनी माणसांला ओळखावे, व्यक्ती म्हणून तिला महत्त्व देऊ नये ही सनातन प्रतिगामी चाल त्याने रूढ केली. पशूंचे कळप असतात. आरंभी माणसांच्या तशाच टोळ्या होत्या. तेथून प्रवास करीत करीत मानव व्यक्तित्वापर्यंत आला होता. मार्क्सवादाने त्याला फिरून कळपसंस्कृतीकडे नेले आहे. मनुष्याला कळपातला एक म्हणूनच मार्क्सवाद ओळखतो. बूर्झ्वा, पेटीबूर्झ्वा, इंटेलिजेन्सिया (त्यातहि बूर्झ्वा इंटेलिजेन्सिया, सोशलिस्ट इंटेलिजेन्सिया, कम्युनिस्ट इंटेलिजेन्सिया), प्रॉलिटॅरियट, लंपन प्रॉलिटॅरियट, पेझंट, स्मॉल पेझंट, आर्टिझन असे अनेक वर्ग सांगून मार्क्सवादाने त्यांच्या कपाळावर, गुरांच्या कपाळी मारतात तसे, गुणवाचक शिक्के मारून टाकले आहेत आणि मागे सुलतानी वृत्तीचे क्रूर अघोरी राजे, हा अमक्या जातीचा समाज, अमक्या धर्माचा समाज म्हणूनच त्यांची कत्तल करीत; त्याचप्रमाणे रशिया, चीन, या देशांत मानवी समाजांची कत्तल करण्याची चाल आहे.