पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०५
मार्क्सप्रणीत चातुर्वर्ण्य

असते, भांडवली सत्तेपासून सर्व समाज मुक्त करणे हे कामगारांचे ध्येय असते, इतर वर्ग कधी क्रांतीत भाग घेतात पण ते स्वार्थासाठी; तो साधताच ते भांडवलदारांचे दास होतात, कामगारांना दगा देतात, असा एक विचार मार्क्सवादात नेहमी सांगितला जातो. त्याचा उल्लेख वर आलाच आहे. पण स्वार्थ साधताच कामगार तरी कामगारांशी एकनिष्ठ राहतात, क्रांतीला दगा देत नाहीत असे दिसते काय ? मुळीच नाही. कामगारांची वृत्ती याही बाबतीत इतरांहून निराळी नाही. आणि आश्चर्य असे की याला मार्क्सनेच पुरावा देऊन ठेवला आहे. इंग्लंडचे साम्राज्य वाढू लागले. तेथल्या भांडवलदारांना अमाप धन मिळू लागलें. अर्थातच त्याचा काही अंश कामगारांना देणे त्यांना प्राप्तच होते. त्यामुळे कामगारांची स्थिती जरा सुधारली आणि त्यामुळे त्यांची क्रांतिवृत्ती नाहीशी होऊ लागली. त्यांच्यावर टीका करताना मार्क्सने मार्क्सवादातील सर्वात तिरस्करणीय असा जो 'बूर्झ्वा' हा शब्द, तो वापरला आहे. हे कामगार बूर्झ्वा झाले, त्यांच्यात भांडवली वृत्ती आली, इत्यादी निर्भर्त्सना त्याने केली आहे. यावरूनच कामगार म्हणजे काही विषेशगुणसंपन्न वर्ग आहे या आपल्या सिद्धान्ताचा मार्क्सने फेरविचार करावयास हवा होता. पण आज शंभर वर्षांनी मार्क्सचे सिद्धान्त इतिहासाने फोल ठरविल्यानंतरही त्याचे अनुयायी फेरविचार करीत नाहीत; तेव्हा मार्क्सने तो केला नाही यांत नवल नाही.
 कामगार, विद्याजीवी व शेतकरी यांच्याविषयी मार्क्सवादाने जे सिद्धान्त मांडले ते कसे भ्रामक व अनैतिहासिक आहेत ते येथेवर सांगितले. मोठे भांडवलदार व लहान व्यापारी- बूर्झ्वा व पेटी बूर्झ्वा- यांच्याविषयीचे त्याचे सिद्धान्त याच मासल्याचे आहेत हे वरवर पाहताही दिसून येईल. ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, जपान या पाच देशांत बड्या भांडवलदारांची सत्ता दीर्घ काळ चालू होती. त्यांपैकी पहिल्या दोन देशांतील भांडवलदार इतरांच्या तुलनेने अतिशय विवेकी व राष्ट्रनिष्ठ असे दिसतात. ते तसे असल्यामुळेच त्या देशात कोणतीही रक्तपाती क्रांती न होता संपत्तीची पुष्कळशी वाटणी होऊन समाजवाद बऱ्याच प्रमाणात आला आहे. फ्रान्सच्या भांडवलदारांनी गेल्या महायुद्धात आपल्या देशाचा विक्रयच केला. मातृभूमी त्यांनी हिटलरच्या ताब्यात देऊन टाकली. जर्मन भांडवलदार