पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/223

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१७ शंकराचार्य आणि रामानुजाचार्य नित्य आहे असे मानले पाहिजे. जीवात्मा नित्य आहे. असे मानण्याला आणखी एक कारण असे कीं, जरी त्याला भिन्न स्थिति प्राप्त झाली (उदाहरणार्थ, स्वप्नस्थिती नंतर जाग्रत् अवस्था प्राप्त झाली ), तरी * मी हे पूर्वी पाहलेले आहे, असे ओळखून तो आपलें नित्यत्व व्यक्त करतो. आणि जीवात्म्याचे नित्यत्व कबूल केले तरच स्मरणाची उपपत्ति लागते. लोकायतिकांचे जे असे ह्मणणें कीं, देहाच्या विद्यमानते मुळे चैतन्य विद्यमान असते, ह्मणून ते देहाचा धर्म, ते वरील विवेचनाने निराकृत होते. दुसरे असे की, दीपक वगैरे प्रकाश देणारी साधनें विद्यमान असतात त्या वेळी आपणांला अनुभव प्राप्त होतो, तीं विद्यमान नसतात त्या वेळी तो प्राप्त होत नाही; परंतु ही गोष्ट जरी कबूल केली पाहिजे तरी ती कबूल केल्या मुळे असे सिद्ध होत नाहीं कीं, अनुभव हा दीपक वगैरे जीं साधने त्यांचा धर्म आहे. ही गोष्ट लक्षात ठेविली ह्मणजे असे दिसून येईल की, देहाच्या विद्यमानते मुळे अनुभव येतो व देहाच्या अभावीं अनुभव येत नाही, ही गोष्ट जरी कबूल केली, तथापि अनुभव हा देहाचा धर्म आहे असे सिद्ध होत नाहीं. तर इतकेच सिद्ध होईल की, दीपकादि साधनां प्रमाणे देह हे अनुभव प्राप्त होण्याचे एक साधन आहे. ही गोष्ट देखील लक्षात ठेविली पाहिजे की, अनुभव उत्पन्न होण्याला देहरूप साधन आवश्यकच आहे, असे नाही. कारण जेव्हां देह निचेष्ट झालेला असतो अशा स्वप्न–अवस्थे मध्ये नाना प्रकारचा अनुभव प्राप्त होतो. या सर्व विवेचना वरून असे सिद्ध होते की, देहाहून स्वतंत्र असा जीवात्मा विद्यमान आहे.'