पान:वेरुळ.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असले तरी मजबुती व उपयुक्तता यांना अगदीच वगळतां येत नाही. नुसते सौंदर्य असलेली वस्तु मनोहर असेल, परंतु ती टिकाऊ व उपयुक्त नसेल तर ती श्रेष्ठ कलाकौशल्याची वस्तु गणली जाणार नाही. रांगोळ्यांना रंगविलेल्या चित्रांपेक्षा व रंगविलेल्या चित्रांना दगडी किंवा धातूंच्या पुतळ्यांपेक्षा कमी लेखण्याचे कारण त्यांचा टिकाऊ. पणा व उपयुक्तता कमी हेच आहे.

 ४. एखाद्या वस्तूचा आपण सामाजिक दृष्ट्या विचार करूं लागलों म्हणजे ती कोणत्या काळी केली, ती करणारांची परिस्थिति काय होती व त्यांचे सामाजिक आचार विचार, तीत किती प्रतिबिंबित होतात यांचा विचार करतो. वस्तूचा काळ, तिचे वर्णन करणारे ग्रंथ व ग्रंथकार, तिची काळाने झालेली झीज व तिच्यात दृग्गोचर होणाऱ्या दुसऱ्या वस्तूंचे काळ यावरून ठरवितात. ज्या ग्रंथांत त्या वस्तूचा निर्देश येतो त्याच्या अगोदर ती वस्तु होती असें ठरते. तिची झालेली झीज होण्यास सामान्य : लागणारे काळाइतकी ती जुनी आहे असें ठरतें व जी जिन्नस या वस्तूंत सांपडते, त्या जिनसेनंतर ती वस्तु झाली असें ठरते. ही कालाचा विचार करण्याची पद्धति आहे.

 ५. ज्या वस्तूबद्दल आपण विचार करीत असतो तो करण्यात लागणारे सामर्थ्य, हत्यारें, द्रव्य व संख्याबळ इतक्या गोष्टी ती करणाऱ्या लोकांच्या परिस्थितीत आवश्य असल्या पाहिजेत हे निश्चित आहे. कापडवरील चित्र पाहिल्यावर ते चित्र काढणा- रांना कापड करणे व त्याचे गुणधर्म, चित्राला लावलेले रंग वगैरे सामान व ते उत्पन्न करून वापरण्याइतके ज्ञान व चित्रे काढण्याइतकें शिक्षण व कौशल्य इतक्या गोष्टी माहित असल्या पाहिजेत हे ठरतें.

 ६. ज्या वस्तूचा आपण विचार करीत असू ती ते लोक कशाकडे उपयोगांत आणीत व तीत केलेल्या सोयी त्यांना कशाला लागत, यावरून त्या करणारांच्या चाली- रीति व आचार-विचारांचे आपणांस ज्ञान होते. याप्रमाणे एका वस्तूच्या सूक्ष्म अभ्यासाच्या योगाने आजूबाजूच्या पुष्कळ गोष्टींची माहिती आपणांस मिळते.

 ७. शिवाय त्या वस्तूचा भव्यपणा, तीत वापरलेले सामान व त्या सामानाचा व अवशेषाचा केलेला उपयोग यांवरून त्या काम करणाऱ्या लोकांची कर्तबगारी आपल्या दृष्टीस पडते.