पान:वेरुळ.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८. आपण या गोष्टी ओळखल्या व त्यापासून आपणांस एक प्रकारचा आनंद झाला, त्याची उर्मी म्हणून आपण त्या गोष्टींचे वर्णन लिहितों व त्यामुळे इतरांना आपण त्या आनंदाचे भागीदार करतो. सर्वच गोष्टी लिहून दाखवितां येत नाहीत म्हणून आपण त्या लिहिण्याला चित्रांची जोड देतो. या चित्रांत अगदी शेलकाच भाग आपण दाख- वितो. कारण याच भागांतील रहस्य आपल्याला शब्दांनी सांगता येत नाही व लोकांना तें कळावें अशी आपली इच्छा असते. ज्या लोकांनी ती वस्तु केली त्यांच्याशी जर आपण समरस असलों किंवा होऊ शकलों तरच तिचे खरें मर्म, खरा सुंदरपणा यांचा आपणांस अनुभव येतो व तो दुसऱ्यांस प्रत्ययास आणून देतां येतो.

 ९. या तात्विक विचारांचा प्रस्तुत पुस्तकांत व वेरूळ व अजंठा या लेण्यांच्या पहाण्यांत आपण कसा उपयोग करूं शकू हे आतां क्रमशः पाहूं:-

[१]. टिकाऊपणा.

 हिंदुस्थानांत कोरीव लेणी फक्त दंडकारण्यांत मात्र आहेत. याचे कारण त्या प्रदेशाची नैसर्गिक रचना होय. ज्वालामुखी पर्वताच्या तोंडातून निघालेला विस्तवासारखा रस थिजून त्याचे अखंड खडक बनल्यावर त्या खडकांत 'अखंड-प्रासाद' करण्याची शक्यता या एका प्रदेशांतच आहे. उत्तर हिंदुस्थानांतील खडक थराथरांचे झालेले आहेत व मद्रास इलाख्यांतील खडक उलथे पालथे झालेले आहेत; यामुळे या प्रदेशांत 'अखंड-प्रासाद' करणेच शक्य नाही. 'अखंड-प्रासाद' म्हणजे शिल्प कर्माची पराकाष्ठा असें भृगु महर्षीचे मत आहे व त्याची त्यांनी दिलेली कारणे खाली दिल्याप्रमाणे आहेत.

 [अ] यांत सगळी इमारत एकजिनसी असून तो जिन्नस (धाता यथा
    पूर्वमकल्पयत्) सृष्टीत जसा निर्माण झाला म्हणजे खालचा दगड
    खाली व वरचा दगड वर असांच वापरण्यात येतो.इतर ठिकाणी
    ही गोष्ट कठीण जाते.

 [आ] या इमारतीची योजना करण्यास फार चातुर्य लागते.एकंदर दगड
   कसा आहे,किती आहे,यांत काय करितां येईल व जें करितां येईल
  त्याच्या अंगोपांगांचे प्रमाण काय ठेवावें या गोष्टी ठरविण्यांत फार
  दक्षता लागते व या अंदाजांत चूक झाली तर ती सुधारून घेण्यास
  फार हुषारी लागते. .