पान:वेरुळ.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२०
पासून स्नानसंध्या, नमस्कार, पुण्याहून नगरला येणे, येथील सर्व संस्थांना भेटी, चार ठिकाणी थोडीशी भाषणे, प्रेक्षणीय स्थळे पहाणे, रात्रौ मेजवानी असें अव्याहत मध्ये विश्रांति न घेतां चालले असून शीण किंवा त्रास मुळीच न होतां सर्व कामे सुव्यवस्थित झाली.

 नगर येथे पहाण्यासारखीं स्थळे ह्मणजे ज्यास चांदबिबीचा महाल ह्मणतात ती एका टेंकडीवरील उंच इमारत, आणि दुसरे नगरचा किल्ला.

 अहमदनगरच्या पूर्वेला अथवा थोडेसें इशान्येला एका टेकडीवर सलाबतखानाची कबर आहे. त्यालाच लोक चुकीने चांदबिबीचा महाल असें ह्मणतात. सलाबतखान मुर्तुझा हा निजामशहा १ ( पहिला १५६५ १५८८ इ. ) याचा मोठा प्रसिद्ध वजीर होता.

 ही इमारत अगदी साधी आणि भव्य आहे. अष्टकोनी जोत्यावर अष्टकोनीच बांधलेली आहे व तीन मजली असून आठही बाजूला मुसलमानी पद्धतीच्या कमानी व घुमट आहेत. भिंती जाड असून त्यांतून वर चढण्यास जिना आहे. पण खालच्या मजल्यांतून दुसन्या मजल्यास जाण्यास लाकडी दादर केला आहे. तें शालजोडीस एखाद्या भलत्याच कापडाचे ठिगळ लावल्यासारखे दिसते.

 अगदी माथ्यावर गेले म्हणजे, आणखीही मजले चढविण्याचा विचार होता असा अर्ध्या राहिलेल्या भिंती वगैरेवरून अदमास होतो.

 वर खूप वारा लागतो. व ज्या मैदानावर अहमदनगर वसलें आहे तें सर्व मैदान सुंदर दिसते. सर्व इमारत सुमारें ऐशी (८० ) फूट उंच आहे. आणि ज्या प्रसिद्ध शूर बेगमेने अहमदनगरच्या किल्याचे संरक्षण इतक्या नेटाने करून आपला देह धारातीर्थी कामास आणला तिच्या स्मरणार्थ अहमदनगरचे लोक या इमारतीला चांदबिबीचा महाल असे ह्मणतात, ते योग्यच आहे असे मनांत येतें. पण तें खरें नव्हे.

 सलाबतखान हा मोठा करारी आणि योग्य माणूस होता. अनेक प्रकारच्या दिव्यांतून त्याला तावून सुलाखून निघावे लागले. कांही काळ कैदही भोगावी लागली. त्याचा मूळचा हेतु औरंगाबादच्या आसपास असलेल्या डोंगरामधील दूरचा दौलता-