पान:वेरुळ.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३

झाली. अर्थात् या उभयतांना त्यांचीही इंग्रजी समजणाराची सोबत आणि सोय झाली.

 मध्यंतरी फेब्रुवारी महिन्यांत दोन दिवस महाबळेश्वरी गेलो होतों. बरोबर दोन मोटारी-क्यूबिट व ओव्हरलंड-होत्या. परत येतांना औंधापर्यंत दोनीही मोटारी पांच पांच वेळां अडकून सुमारे दोन तास वेळ जास्त लागला. तेव्हां अशा जुन्या मोटारी घेऊन जातांना चारशें व येतांना नाशकावरून पांचशे मैलांचा प्रवास करण्याचा बेत करणे ह्मणजे “तितीर्षुर्दुस्तरं मोहादुडुपेनास्मि सागरम्” (कालिदास, रघुवंश सर्ग १ शोल्क २ ) पैकी झाले असतें. मुलांबाळांना त्रास, बाकीच्या मंडळींला त्रास आणि विनाकारण वेळ जाऊन ज्या ठिकाणी ज्या वेळेला जावयाची वेळ नक्की केलेली, त्या वेळी त्या ठिकाणी पोहोचलें नाहीं ह्मणजे एक प्रकारचा वेडेपणा पदरांत यावयाचा, हे बरोबर नाही असे वाटले.

 आमच्या तीन मोटारी होत्या. त्या तीनीही जीर्ण आणि वारंवार ठेंचकळणाऱ्या व पेट्रोल जास्त खाणाऱ्या अशाच होत्या. भाड्याच्या मोटारी कराव्यात तर त्याला हजारों रुपये खर्च येणार. तेव्हां तीही गोष्ट शक्य नव्हती. बरें, नव्या मोटारी घ्याव्यात तर बजेटांत सवड नव्हती. अशा परिस्थितींत काय करावें हा मोठा प्रश्न येऊन पडला.

 शेवटी आह्मी आपल्या खाजगींतील दहा हजार रुपये देऊन दोन नव्या मोटारी खरेदी कराव्या आणि रक्कम एकदोन वर्षांत हळुं हळुं परत घ्यावी असे ठरविलें. किर्लोस्कर यांस बोलाविलें. रक्कम त्यांस दिली आणि तुमच्या माहितीनें दोन चांगल्या मोटारी खरेदी करा ह्मणून त्यांस सांगितले. त्यांची एक मोटार होती तीही जुनी आणि वारंवार ठेंचकळणारी अशीच. ह्मणून त्यांनीही एक नवी मोटार खरेदी करावयाचे ठर- विलें. या खरेदीसाठी त्यांच्या कारखान्यापैकीं रा. अंदोबा फळणीकर व सांब दर्शने असे मुंबईला गेले. आह्मी आपला मुख्य ड्रायव्हर हाजी यूसफ यासही पाठविलें. कारण मोटार वाफरणारा तो असल्यामुळे कोणताही डाग त्याने चालवून पसंत करून घेतलेला बरा.

 आह्मी दरम्यान कमींत कमी किती सामान पाहिजे, ट्रंका, पेट्या किती घेतल्या पाहिजेत, अंथरापांघरावयाचें सामान थोडक्यांत थोडकें कितीं घेतां येईल, हे पाहून प्रत्यक्ष मोटारी आणून त्यांत सामान भरून पाहिले. प्रवासाला निघालें ह्मणजे सामान इतकें बरोबर न्यावेसें वाटतें कीं, या सामानाच्या भयानें प्रवासच ऐनजिनशीं न केलेला बरा अरा वैताग येतो.