पान:वेरुळ.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३) अजंठ्यास जातांना.

 अजंठ्यास जाण्याचा बेत प्रथम ठरला त्या वेळीं वेरूळास कांहीं मुक्काम करावा असें मनांत नव्हते. ह्मणून १५ मार्च रोजी अजंठ्यास जावें असें नक्की झाल्यावर प्रथम आपण औंधाहून १० मार्च १९२६ रोजी निघावें असा बेत केला. त्याप्रमाणे येणाऱ्या सर्व मंडळीस आणि ज्या ज्या ठिकाणी मुकाम व्हावयाचा होता त्या त्या ठिकाणच्या व्यवस्थापकांस अगाऊ लिहून ठेविलें.

 पण १० तारखेला निघाले झणजे ११ ला पुणे, १२ नगर, १३ औरंगाबाद आणि १४ अजंठा असें ठरल्यानंतर खुद्द सौ. राणीसाहेब आणि बाजीराव, किर्लोस्कर वगैरे इतर मंडळी, ज्यांनी वेरूळची लेणीं मुळीं पाहिली नव्हती त्यांस तीं, दौलताबादचा किल्ला, व एक दिवस पैठणास जावयाचें त्याला दिवस उरला नाहीं. ह्मणून दोन दिवस आधीं ह्मणजे सोमवार तारीख ८ रोजी औंधाहून निघावें असें ठरविले. व याप्रमाणे जाण्याचा बेत फिरवून नक्की केला. ह्मणून बरोबर येणारे बाहेर गांवच्या लोकांस फिरून पत्रें लिहिली. आह्मी वेरूळची लेणीं सन १९०७ साली एकवार पाहिली होती. पण अजंठ्याप्रमाणे फार घाईनें ह्मणजे केवळ एक दिवसांतच पाहिली. त्यामुळे तीं फिरून शांतपणानें पहावीत असे आह्मालाही वाटलें.

 प्रथम जाण्याचा वार बुधवार अशासाठी ठरविला होता की, अजंठ्यास जाईतों मध्यें उपवास येऊं नये. आतां सोमवार आला. पण त्यास कांहीं इलाज नव्हता. एकट्या आह्मां उभयतांच्या उपवासाबद्दल इतर मंडळींची वेरूळ पहाण्याची संधि बुडविणें योग्य नव्हतें.

 वेरूळ येथील प्राचीन खोदकाम, अजंठा येथील खोदकाम व चित्रे आपल्या पदरच्या कारागिरांसही दाखवावीत असें मनांत येऊन आमच्या वडिलांपासून संस्थानांत मूर्तीचें काम करीत असलेले पांडुरंग चिमाजी पाथरवट आणि त्यांचा धाकटा मुलगा महादेव यांस तुम्ही उभयतां आमच्या बरोबर प्राचीन शिल्पकलेचा नमुना पहावयास