पान:वेरुळ.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०
 अर्थात् आह्मी त्यांस समक्ष भेटीस बोलाविलें. ते औंधास मुद्दाम येऊन भेटले. सर्व बंदोबस्त उत्तम करतों असें ह्मणाले. आह्मीही त्यांच्याशी पत्रव्यवहार करूं लागलों. त्यांनी लिहिण्यांत असे लिहिले की अजंठा सालरजंग यांचे जहागिरीपैकी आहे. त्याअर्थी त्यांस एक पत्र लिहून आमचा इंतजाम ठेवण्याविषयी लिहावें. आह्मी पत्र लिहिलें. उलट सालरजंगाकडूनही पत्र आले की 'फरदापुरास आपणास त्रास होईल, याकरितां आपण आमच्या अजंठा येथील वाड्यांतच रहावें; ह्मणजे तेथील तहशीलदाराकडून आपला इंतजाम उत्तम ठेवण्यांत येईल. '

 ज्याअर्थी आह्मी अजंठ्यावरून जावयाचें ठरविलेंच होतें, त्याअर्थी त्यांच्या या पत्राला रुकार देण्यास आम्हाला हरकत नव्हती. अजंठा या गांवाच्या नांवावरून आमची कल्पना अशी झाली कीं, तेथून लेणी फरदापूरपेक्षां जवळ असणार. आपला माणूस प्रत्यक्ष पाठवून चौकशी केली असती, त्यास थोडीबहुत रक्कम खर्च झाली असती तर चांगलें झालें असतें. पण असें झालें असतें तर तसे झालें असतें, या ह्मणण्यांत मागाहून कांहींच अर्थ नसतो. जें झालें तें चांगलेच झालें असें ह्मणणे भाग पडतें.