पान:वेरुळ.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


कांहीएक सोय होणार नाही, अशी खात्री झाली. आणि रेल्वेनें सामान पाठवावयाचें नाहीं असेंच आह्मी ठरविलें.

 अर्थात् सर्व व्यवस्था मोटारीमध्ये होईल असेच करणें प्राप्त झाले. बाडबिछाना प्रत्येकाचा इतका थोडा घ्यावा की तो सहज मोटारीमध्ये जावा असे ठरविले. आणि ज्या ठिकाणी मुक्काम होणार त्या ठिकाणच्या चिरपरिचित माणसांनी भांड्यांची व्यवस्था करावी हाणजे भांडीकुंडी बरोबर नेण्याचा त्रास नको असे मनांत आलें.

 आमचा पहिला मुक्काम पुण्यास व्हावयाचा होता. अर्थात् त्या ठिकाणी आपला वाडा, सामानसुमान, भांडीकुंडी आहेतच. तेथें सर्व व्यवस्था होतीच.

 दुसरा मुक्काम अहमदनगर येथें व्हावयाचा होता. तेथें आमचे चुलत बंधु रा. रा. गणेश बाबाजी हिवरेकर यांवे पाहुणे तांबोळी ह्मणून आहेत, त्यांच्याकडे भांड्यांची व्यवस्था होणें शक्य होते. आमचे इंडस्ट्रिअल लॅबोरेटरीचे सुपरिटेन्डन्ट, रा. मुळे हेही नगरनजिक भिंगारचे; त्यांनीही सर्व व्यवस्था उत्तम ठेवतों ह्मणून कळविलें. अर्थात् दुसन्या मुक्कामाचा बंदोबस्त झाला.

 तेथून आमचा तिसरा मुक्काम औरंगाबादेस व्हावयाचा होता. त्या ठिकाणी कसे करावें ही पंचाइत थेऊन पडली. औरंगाबादेहून दौलताबादचा किल्ला व तेथून वेरुळास जावयाचें होतें. व तेथूनच पन्नास मैलांवर अजंठा आहे, असे मोटारीच्या नकाशावर रस्ता दाखविला होता त्यावरून आह्मी अनुमान काढलें.

 रा. लक्ष्मणराव किर्लोस्कर बरोबर यावयाचें ठरले होतें. त्यांच्या ओळखीचा औरंगाबादेस कोणी आहे किंवा काय हा तपास केला. कारण त्यांच्या नांगरांचे एजंट ठिकठिकाणी आहेत. त्यांनी आपला एक मारवाडी गृहस्थ औरंगाबाद येथें एजंट असून फार संभावित व श्रीमान् गृहस्थ आहे अशी बातमी लिहिली.

 पैठण येथील श्रीशिवदिन केसरीनाथांचे संस्थानची मालकीण हल्ली अज्ञान आहे. ती आमच्या नातीची मुलगी. त्या संस्थानचा कारभार निजाम सरकारच्या परवानगीनें आमच्या खुद देखरेखीखाली आमचे संस्थानांतील मामलेदारीच्या रँकेचे एक गृहस्थ रा. नरहरि विष्णु पेंढारकर पहात असतात. औरंगाबादेहून पैठण फक्त ३० मैल आहे.