पान:वेरुळ.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


वर्षात आह्मी पुणे, मुंबई, बेळगांवपर्यंत रेल्वेने प्रवास केलाच नाहीं झटलें तरी चालेल. जवळ जवळ कोठेंही केला नाहीं असेंच वाटतें.

 यामुळें रेल्वेच्या प्रवासापेक्षां मोटारीनें प्रवास करणें जास्त इष्ट व सुखकर होईल असे आह्मी ठरविलें.

 नंतर अर्थात् खाशी माणसे किती, नोकरचाकर किती, इष्टस्नेही किती, त्यांना एकंदर मोटारी किती लागतील, सामानसुमान किती घ्यावें लागेल, तें कसे घ्यावयाचें, स्वयंपाकाची भांडीकुंडी कशी घ्यावयाची वगैरे विचार करणे अवश्य झालें.

 स्वयंपाकाची भांडीकुंडी बरोबर घ्यावयाची झटल्यास ती मोटारींतून नेणें शक्य नव्हते. कारण आमची खाशी मुलेबाळें, स्नेही, इष्ट आणि नोकरचाकर मिळून चाळीस माणसे होत होती. इतक्या माणसांचे अंथरापांघरावयाचे व इतर कपडेलत्ते कसेतरी अडचणीनें मोटारीमध्ये मावले असते. पण स्वयंपाकाची चाळीस माणसांची भांडी मोटारीत घेणे अशक्य होतें.

 त्याचप्रमाणे आह्मी आपले निजावयाचे विस्तीर्ण अगर अगदी वाटचालीचे बिछाने घेतले असते, तर तेही मोटारीमध्ये मावणे अशक्य होतें.

 अशा अडचणींमध्ये, भांडीकुंडी आणि बिछाने वगैरे रेल्वेने पाठवावेत की काय, असाही एक विचार मनामध्यें आला. पण या बेतालाही अडचणी होत्याच. अर्थात् पहिली अडचण झणजे, ज्या म्हातारीसाठी वेगळे निघावयाचें ती पुन्हां वाटणीला येतच होती. रेल्वेवर गड्ढे चढविण्याचा त्रास नको ह्मणून मोटारीने प्रवास करावयाचा होता. तर बाडबिछायतीला, भांड्याकुंड्यांना का होईना पुन्हां रेल्वे आली; ह्मणजे सामानसु- मानाबरोबर अर्थात् चारदोन चाकर रेल्वेने जाणें अवश्य आलेंच. शिवाय आह्मी सर्वच रेल्वेने गेलो असतो तर लगेज वजा झालें असतें. आतां आम्ही जाणार मोटारीने आणि सामान जाणार रेल्वेनें; ह्मणजे दुहेरी खर्च.

 शिवाय आम्ही चारपांच ठिकाणीं मुक्काम करणार. त्या ठिकाणी आमची व आमच्या सामानाची-रेल्वेच्या साहजिक गैरसोई आणि स्टेशनमास्तर वगैरेंनी मुद्दाम केलेल्या गैरसोई यांमध्ये-गांठ कशी पडणार, हा मोठा तिढ्याचा प्रश्न येऊन पडला. एकंदरीत अशा दुहेरी प्रवासापासून खर्च जास्त होऊन गैरसोय मात्र उत्तम होईल.