पान:वेरुळ.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


नाहीं ह्मणतां येईना. त्या आल्यावर अर्थात् चिरंजीव मुले कोणापाशी रहाणार ? त्यांना नेणेंही अवश्य झालें. इतक्या खाशा माणसांबरोबर शागीर्द, अचारी, पाणके, कोटणीस, कारकून, कामगार ही मंडळी अर्थातच आली.

 आपण प्राचीन चित्रकला पहावयास, तत्संबंधी विचार करावयास आणि त्यांच्या नकला घेण्याची व्यवस्था करावयास जाणार. त्या ठिकाणी आपणांस जो आनंद आणि लाभ होणार त्याचा अंशतः वांटा आपल्या स्नेह्यांस आणि प्रेमाच्या माणसांसही मिळावा अशी साधारण सर्वांचीच इच्छा असणे साहजिक आहे.

 शिवाय अशा प्रेमाच्या आणि रसिक माणसांच्या सहवासांत आपला प्रवास जास्त आनंददायक होऊन, जें ठिकाण पहावयाचे त्याच्या संबंधानें अनेक वेळां जास्त माहिती मिळण्याचा संभव असतो. चित्रांसंबंधाचा वगैरे उहापोह करण्यामध्ये अनेक गोष्टींचें विशदीकरण होत असते. यामुळे पाहिलेल्या गोष्टी जास्त उमगतात; आणि अनेक वेळां त्यांवर कांहीं निराळाच उठाव होण्याचा संभव असतो. अशा अनेक कार णांमुळे आह्मी आपल्या स्नेह्यांतील कांही मंडळी बोलाविण्याचा विचार केला.

 रा. सा. बाजीराव गुत्तीकर, रा. रा. लक्ष्मणराव किर्लोस्कर आणि शंकरराव किर्लोस्कर या मंडळींस पत्रें लिहून, कोणाला आग्रह करून, कोणाला आज्ञा करून, या म्हणून सांगितले. या सर्वांनी येण्याचें कबूल केलें. सौ. राणीसाहेब यांनी सौ. राधाबाई किर्लोस्कर यांस निमंत्रण केले. त्यांची तबियत आज बरेच महिने चांगलीशी नव्हती. पण या प्रवासांत आणि अजंठा, वेरूळकडील हवेंत तुमच्या तबियतीस फार फायदा होईल, असे आमिष त्यांना लावतांक्षणी त्यांनीही येण्याचें कबूल केलें.

 रेल्वेनें जावयाचें ह्मणजे, फर्स्ट क्लासाचे डबे, तीन ठिकाणी आगगाड्या बदलणें, आगगाड्याच्या वेळा साधण्याकरितां स्नानसंध्येच्या आणि जेवणाखाण्याच्या तारंबळी, ठिकठिकाणी उतरण्याची, सामानसुमानाच्या बांधाबांधीची, चढउताराची गैरसोय, लगेज, स्टेशनमास्तर, हमाल, गुड्सक्लार्क वगैरे चोरामोरांची चिरिमिरी, चोरीमारी, इतक्या त्रासाचा प्रवास होणार. त्यामध्यें खर्च अधिक लागून सुखापेक्षां खटपट आणि उपाधीच अधिक होणार; असा आह्मी विचार केला.

 या रेल्वेच्या प्रवासाच्या वेळेच्या गैरसोईमुळे आणि खर्चामुळे हल्लीं आठदहा