पान:वेरुळ.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कालगणना होऊन गेली आहे कीं, हिंदु लोकांना कालाचें महत्वच वाटत नाहीं. हे लोक व्यक्तिनिष्ठ नसून तत्वनिष्ठ आहेत. व्यक्ति जन्मतील, कांहीं काळ चमकतील व मरतील आणि विसरल्या पण जातील. यासाठी त्यांच्याकडे लक्ष्य न देतां तत्वा- कडे लक्ष्य द्यावें असें ते म्हणतात. रावणाला श्रीरामांनी कोणत्या शकाच्या कितव्या सालीं व कोणत्या महिन्याच्या कितव्या तिथीला मारलें ही गोष्ट ते महत्वाची समजत नाहींत. तर अनीतिमान् मनुष्य रावणासारखा संपन्न व पराक्रमी असला तरी तो श्रीरामासारखा नीतिमान् साध्या माणसाच्या व वानरांसारख्या दरिद्री लोकांच्या हातून मरतो हे सर्वांनी लक्ष्यांत ठेवावें असें ते म्हणतात. वरून हिंदु लोकांना इतिहासाची दृष्टि नाहीं असें कोणी म्हणेल तर म्हणो. परंतु त्यांना इतिहासाची व काळाची पर्वा नाहीं इतकी गोष्ट खरी. असो.

 वेरूळ व अजंठा येथील कोरीव लेणी कोणी, कधीं व कां खोदलीं याचा सवि- स्तर इतिहास मुळींच उपलब्ध नाहीं. एका कोरीव लेण्यावर एक शिलालेख आहे त्यावरून ठोकळ मानानें यांच्या कोरण्याच्या कामाच्या काळाचा अंदाज करितात. या शिलालेखावरून शिलालेखाच्या पूर्वी ही अस्तित्वांत होतीं इतकाच निष्कर्ष काढतां येतो परंतु तीं त्य। मित्तीला कोरून झाली, कां त्या मित्तीला त्यांच्या कोर- ण्यास प्रारंभ झाला, कां मध्यंतरीच कांहीं विशिष्ट गोष्ट घडली ती त्या शिलालेखांत नमूद आहे याचा कांहींच नक्की सुगावा लापणांस लागत नाहीं. बरें, या लेण्यांतून जो दगड कोरून काढला त्याचे ढीग लेण्यांजवळ कां नाहींत ? तो सर्व माल काय झाला ? तो वाहून जाण्याइतके पाणी तेथें नाहीं; तो विरून माती होण्यासारखा ठिसूळही नसावा; तो लेण्यांतच कोठें तरी वापरला म्हणावा तर तशी जागा दिसत नाहीं. हा माल कांहीं थोडा थोडका नसणार. मग याचें काय झाले याचा शोध व्हावयास पाहिजे. यावरून कदाचित् काळ समजेल.

तात्पर्य :- -हीं कोरीव लेणीं कधीं कोरलीं, कोणी म्हणजे किती माणसांनीं, किती दिव सांत कारली, कशांनी कोरलीं, कोरून काढलेल्या मालाचें काय झाले, त्यांना खर्च किती आला वगैरे अनेक प्रश्न तीं लेणी पहाणारांना भंडावून सोडतात व असले काम करणाऱ्या माणसांबद्दल धन्यता वाटते. हीं लेणीं कोरतांना यंत्रे वगैरेंचें सहाय्य कितीं घेतलें असेल व कामे करणारांची राहणे वगैरेची सोय कशी केली असेल हरि जाणें !