पान:वेरुळ.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[इ] जागच्या जागीं माल घडणें व त्यावर चित्रें कोरणे हे मोठ्या कसबाचे
काम आहे. या ठिकाणीं घडतांना दगड उलथा पालथा करितां येत
नाहीं किंवा कारागिरांस त्याचे मागें अगर बाजूंस जातां येत नाहीं,
अगर एक दगड खराब झाला तर तो फेंकून देऊन दुसरा घेतां येत
नाहीं. छतावर चित्रे काढणें व कोरणें हें काम फारच कठीण आहे.
कारण कोणालाही असें उताणें पडून काम करण्याची संवय नसते व
डोळ्यांत केर जाण्याचें भय असतें. असें अवघड काम बिनचूक
करणे हे कसब.


[ई] ज्याला ऐपत असेल त्यानें 'अखंड-प्रासाद' च करावा. हा उन्हाळ्यांत
थंड व हिवाळ्यांत उबदार असतो. पावसाळ्यांत हा गळत नाहीं
किंवा यावर वीज पडत नाहीं.


 हिंदुस्थानांतील दुसरा कोणताही भाग या कामाला अशा रितीनें स्वभावतःच लायख नाहीं.

[२]. उपयुक्तता.

 समाजांत अशीं कांहीं माणसं अवश्य लागतात की, ज्यांनी विरक्त होऊन समाजापासून दूर एकांतांत रहावें व तेथे समाजसुस्थिति व जगाचें कल्याण यांचा विचार करून नियम ठरवावे व मागील नियमांच काय परिणाम झाले हैं पाहून समाजशास्त्र व धर्मशास्त्र बनवावें. उपनिषत्कालापासून थेट श्रीसमर्थापर्यंत सर्व थोर माणसांनी एकांताची इतकी महती गायिली आहे त्याचे कारण हेच. अशा माणसांना निरुपाधिक रितीने राहून एकांतांत विचार करण्यासाठी बसण्यायोग्य जागा म्हणजे हीं लेणींच होत. वेदकाळी तपोवनें होती परंतु ती त्रासदायक होतात असे पाहून अनुभवानें ह्रीं लेणी उत्तम असे ठरलें व त्याप्रमाणे तीं तयार करण्यांत आली. एकांतप्रिय अशा मंडळींना सुखदायक व आरोग्यकारक अशा याच जागा होत. या ठिकाणी केवळ सामाजिक व भौतिक बाबींचाच नव्हे तर पारमार्थिक व अतिभौतिक बाबींचाही विचार करणं सोयीचं असतें. समाजाची ही सोय व्हावी म्हणूनच धनिकांनी येथें आपलें पैसे खर्ची घातले व त्याबद्दल कीर्तीचीसुद्धां अपेक्षा ठेवली नाहीं. खरें निष्काम व गुप्तदान हेंच होय व समाजाची खरी चिरकालिक सेवाही हीच असे म्हणण्यास हरकत नाहीं.