प्रणय, विरह, मीलन, फाळणी, जगणे, शोषण, नाती, इच्छा, आकांक्षा, पर्यावरण सारे विषय सामावून घेण्याची कुवत असलेल्या या त्रिपदीत मनुष्य, निसर्ग व जीवनसंघर्षाचा त्रिवेणी संगम आहे. उर्दू, अरबी, फारसी, शब्दांजागी समर्पक मराठी शब्दरचना करून शांता शेळके यांनी मराठी त्रिवेणी मूळ हिंदी इतक्याच दर्जेदार बनवल्या आहेत. या त्रिवेणीत जीवनाचा सुस्कारा जसा आहे, तशी जीवन सुसह्य करण्याची शक्ती पण! जे लिहाल त्याची साक्ष देईन मी बिनचूक? सारख्या ओळीतून शांताबाईंच्या मनातील अनुवादकाचा आत्मविश्वासच एका अर्थाने प्रकट झाला आहे. हा आत्मविश्वासच या अनुवादाचे आत्मबल होय. हिंदी ‘त्रिवेणी'चा मराठी अनुवाद मात्र शब्दांची टांकसाळ नसून भावनेने गुंफलेली ती मोहनमाळ होय! गुलजार नि शांता शेळके यांच्या काव्यातील भावबंधांचा धांडोळा घेणाऱ्यांना हा अनुवाद भाव नि भाषा सेतू ठरल्याशिवाय राहणार नाही, असा मला विश्वास वाटतो.
अनुवादक - शांता शेळके
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे