पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अनुभवजन्य तशीच भावसमृद्ध! मराठी अनुवाद करताना शांता शेळके यांनी मूळ ‘त्रिवेणी'तील आशयास धक्का लावू न देता त्यांचा अनुवाद केला आहे. काही ठिकाणी तर हा अनुवाद मूळ रचनेच्याबरहुकूम झालेला आढळतो.

 वह जिससे साँस का रिश्ता बंधा हुआ था मेरा
 दबा के दाँत तले साँस काट दी उसने
 कटी पतंग का मांझा मुहल्ले भर में लुटा।
 सारख्या या हिंदी ‘त्रिवेणी' चा शांता शेळकेंनी केलेला खालील मराठी अनुवाद याचा ठळक पुरावा म्हणून सांगता येईल.

 जिच्याबरोबर श्वासाचे धागे जोडले होते मी,
 ते नातेच दातांनी धागा तोडावा तसे तोडले तिनेआणि...
 आता काटलेल्या पतंगाचा तुटका मांजा लुटला जातो आहे मोहल्ल्यात!
 ही गोष्ट अलाहिदा की जोडलेच्या ठिकाणी ‘जडले' नि ‘मोहल्ल्याच्या ठिकाणी ‘गल्लीत' शब्दांची रचना चपखल ठरली असती.

 ‘त्रिवेणी' या गुलजारांच्या नवरचित छंदांच्या संग्रहाचा मराठी अनुवाद हा शांता शेळके यांनी मराठी साहित्यास दिलेली शेवटची देणगी नि म्हणून तिचे ऐतिहासिक मूल्य राहील. हा अनुवाद गुलजारना इतका भावला की, त्यांनी तो खालील शब्दात शांताबाईंना समर्पित केला-
 शान्ताबाई,
 आप सरस्वती की तरह मिली।
 और सरस्वती की तरह गुम हो गयी।
 ये ‘त्रिवेणी' आप ही को अर्पित कर रहा हूँ।
  गुलजार.
 मूळ रचनाकाराने अनुवादकाचा केलेला असा सन्मानही माझ्यासारख्या, अन्य अनुवादक, अभ्यासकास वैश्विक घटना वाटल्यावाचून राहणार नाही. अशी दाद दर्दी कलाकारच देऊ जाणे।

 सरस्वतीच्या प्रतीकात्मक चिन्हाचे साधे परंतु आशयघन मुखपृष्ठ लाभलेला हा मराठी भाषांतरित काव्यसंग्रह मूळ हिंदी ग्रंथांच्या एक तृतीयांश किमतीत मराठी काव्यरसिकांना त्यांच्या बोलीत उपलब्ध करून देऊन मराठी प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाउसने ‘मराठी पुस्तके महाग असतात' हा आरोप अपवादाने खोटा ठरवला आहे. तो नियम होईल, तर मराठी साहित्याचा प्रसार होण्यास साह्य होईल, त्रिवेणी' या भाषांतरित गझल संग्रहात विषय वैविध्य आहे. प्रेम,

वेचलेली फुले/९४