पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करून पुस्तकाचे समीक्षामूल्य जपले आहे. शेवडेगुरुजींनी नाट्यप्रवेशिकाही लिहिल्या. पाच नाट्यग्रंथांत त्यांच्या तेरा प्रवेशिका संग्रहित करण्यात आल्या आहेत. या नाटुकल्यांचा आशय, मांडणी, भाषा, कथासार, देऊन त्यांचे साहित्यिक मूल्य लेखकाने आवर्जून प्रतिपादिले आहे. शेवडे गुरुजींनी कुमारांसाठी कादंबरिका लेखन करून बालवयातील वाचनवेड स्थिरस्थायी व्हावे म्हणून धडपड केली. कथा प्रांतानंतरचा मुलांचा प्रिय साहित्यप्रकार म्हणजे चरित्रे. बालवयात भाषणांची सुरसुरी भागविणारी चरित्रे प्रेरक ठरतात, हे लक्षात घेऊन गुरुजींनी अनेक चरित्रे लिहिली. श्री. महाडेश्वर यांनी या चरित्राची विषय, आशय लक्षात घेऊन विभागणी केली आहे. याशिवाय या पुस्तिकेत लेखकाने संकीर्ण लेखन, गुरुजींची साहित्य चळवळ, योगदान, जीवनपट, समग्र साहित्यसूची, गुरुजींवरील संदर्भलेख व लेखनाची माहिती देऊन हे पुस्तक माहितीच्या अंगाने स्वयंपूर्ण व समग्र बनविले आहे.

 श्री. महाडेश्वरांनी मोठ्या कष्टाने लिहिलेल्या व प्रकाशित केलेल्या या ग्रंथाचे साहित्य, संशोधनाशिवाय जसे सामाजिक मूल्य आहे; तसेच ऐतिहासिक मूल्यही आहे. शेवडे गुरुजींनी ज्या काळात पुस्तके लिहिली, त्या काळात प्रकाशक ती छापण्यास अनुत्सुक असायचे. गुरुजींनी पदरमोड करून ती छापली. दारोदार जाऊन विकली. वयाच्या साठाव्या वर्षी त्यांना अन्य प्रकाशक लाभले. ही त्यांची बाल नि साहित्य निष्ठा. इतक्या प्रतिकूल स्थितीत मार्गक्रमण करणारे शेवडेगुरुजींनी आपल्या अमृतमहोत्सवी समारंभात लाखाची रक्कमही आंतरभारतीच्या वि. स. खांडेकर स्मारकासाठी दिली, हे सांगणारे हे पुस्तक प्रत्येक मराठी घर, ग्रंथालय, शाळेत जाऊन केवळ चालणार नाही, तर मुलांशी नाते जोडण्याची जबाबदारी असलेल्या प्रत्येक शिक्षकाने ते दैनिक आचाराचा परिपाठ म्हणून अभ्यासायला हवे.


‘बालकुमार साहित्यसेवक रा. वा. शेवडेगुरुजी :

 जीवन व साहित्य (चरित्र)
 लेखक - शशिकांत महाडेश्वर
 प्रकाशन- मनोज प्रकाशन, कोल्हापूर

 पृष्ठे - ५६  किंमत - ३५ रु.

♦♦

वेचलेली फुले/९०