‘संत साहित्य आणि अंधश्रद्धा निर्मूलन' : विहंगमावलोकन
भारतीय समाज आज पुन्हा एकदा धर्म, देव, दैव, जात आदींसारख्या विज्ञानाधिष्ठित समाजरचनेस छेद देणाऱ्या विचारधारांच्या विळख्यात अडकतोय की काय अशी साधार भीती वाटू लागली आहे. धर्म, संत यांची एके काळची विश्वासार्हता लोप पावली आहे. याचे कारण समाजमनाचे राजकीयीकरण होणंच आहे. पूर्वी समाज धर्माधिष्ठित होता. समाजावर राजाचे वैधानिक अधिपत्य असलं, तरी नैतिक नियंत्रणाचा लगाम संतांच्या हाती होता. संत विचार आचारांनी स्वतंत्र होते. ते राजसत्तेसही फटकारताना मुलाहिजा ठेवत नसत. आज राजकीय पक्षांचे देशावर अधिपत्य आहे. राजकीय पक्ष विचारभ्रष्ट जसे आहेत तसे ते आचारभ्रष्टही. दुर्दैवाने त्या सर्वांचे कुणी ना कुणी बाबा महाराज, संत, महंत, आश्रयदाते, आशीर्वादी, पुरस्कर्ते व समर्थक आहेत. आजचे संतच राजकीय वळचणीत दबा धरून बसलेले आश्रित व गुलाम झाले आहेत. अशा परिस्थितीत प्राचीन संतांचे विचार ख-या अर्थाने अंधश्रद्धा निर्मूलन करणारे होते. धर्मनिरपेक्ष नसले तरी परधर्म सहिष्णू होते. हे त्यांच्या साहित्यावरून सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट होते. आज धर्म, संत, देव जातींचा वापर समाजास सर्रास दिग्भ्रमित करण्यासाठी होत असतानाच्या काळात प्राचार्य रा. तु. भगत यांनी संपादित केलेला ‘संत साहित्य आणि अंधश्रद्धा निर्मूलन' सारखा ग्रंथ डोळे उघडणारा, विवेक जागवणारा ठरतो. ग्रंथास प्राचार्य राम शेवाळकरांची प्रस्तावना आहे. तिचा बराचसा भार श्रद्धेवर खर्च झाला असला तरी संतांच्या अंधश्रद्धेचे कार्य ते नाकारत नसल्याने ती ग्रंथांच्या विषयवस्तूस पुढे नेणारी ठरली आहे.
अंधश्रद्धा निर्मूलनानेच समाज पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, मानवतावादी, समताधिष्ठित होऊ शकेल. याबद्दल प्राचीन संतांच्या मनात शंका नव्हती. त्यामुळे ते अंधश्रद्धेवर प्रहार करण्यास मागे पुढे पाहात नसत. या ग्रंथातील कबीरांचे विचार यासंदर्भात लक्षात घेण्यासारखे आहेत. यामध्ये बावीस अभ्यासकांचे लेख आहेत. बाराव्या शतकापासून ते विसाव्या शतकापर्यंतच्या नऊशे वर्षांतील प्रागतिक, पुरोगामी, विचारांच्या संतांच्या साहित्याचा अभ्यास