Jump to content

पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बालकुमार साहित्यसेवकाचे जीवन व साहित्य


 मराठी साहित्याच्या इतिहासातील सर्वाधिक उपेक्षित अंग म्हणजे बालकुमार साहित्य! म्हणूनच की काय, मराठी बालकुमार, साहित्यिकांच्या जीवनाचा व साहित्याचा वेध घेणारे पुस्तक मराठी सारस्वतात सापडणे हा कपिलाषष्ठीचा योग म्हणायला हवे. असा योग श्री. शशिकांत महाडेश्वर यांनी लिहिलेल्या ‘बालकुमार साहित्यसेवक रा. वा. शेवडेगुरुजी : जीवन व साहित्य' या पुस्तकामुळे घडून आल्याने त्याचे स्वागत करावे तेवढे थोडेच आहे.
 रा. वा. शेवडेगुरुजी गेल्या शतकाच्या उत्तरार्धातील मराठीतील ज्येष्ठ बालकुमार साहित्यिक. आपल्या ८६ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी १०८ पुस्तकांचे लेखन व प्रकाशन करून कित्येक मराठी पिढ्यांची जडणघडण केली. श्रीमती माँटेसरींचे प्रत्यक्ष शिष्य, साने गुरुजींचा आशीर्वाद व प्रेरणा, वि. स. खांडेकरांचा निकटचा सहवास, मास्टर विनायकांचे प्रोत्साहन या सर्वांमुळे शेवडे गुरुजींचे जीवन समृद्ध व संस्कारित झाले. ५0 कथासंग्रह, तीन कवितासंग्रह, पाच नाटुकली, सहा कादंबच्या, ३८ चरित्रे, पाच विविध बालग्रंथ लिहिणाऱ्या शेवडेगुरुजींनी एका पुस्तकाचा अपवाद वगळता सारे लेखन बालकांसाठी केले.

 बालसाहित्य समीक्षेच्या प्रांगणात संशोधनात्मक लेखनाचा नवा पायंडा पाडणा-या या छोटेखानी पुस्तकात लेखकाने विविध अंगानी शेवडेगुरुजींच्या जीवनाचा व साहित्याचा वेध घेतला आहे. ‘जीवन व कार्य' मध्ये जन्म, बालपण, शिक्षण, उपजीविका, साहित्यसेवा, बालसाहित्य चळवळीतील भागीदारी, कौटुंबिक जीवन, लाभलेले मानसन्मान, सर्वांचा वस्तुनिष्ठ आलेख आहे. ‘कथाविश्व' प्रकरणात कथालेखनामागील प्रेरणा नोंदवून उपलब्ध कथासंग्रहांचा परिचय देण्यात आला आहे. तिस-या भागात शेवडे गुरुजींच्या काव्य लेखनाचा आढावा आहे. गुरुजींच्या काव्यसुमनांची नावे ‘बालिश बडबड’, ‘बाळगाणी', असली तरी बालमनाचा गंभीर विचार करून त्यांना गुणगुणायला शिकविण्याच्या उद्देशाने ती लिहिली होती, हे लेखक लक्षात आणून देतो. या भागात महाडेश्वरांनी गुरुजींची काव्यवैशिष्ट्ये अधोरेखित

वेचलेली फुले/८९