बंदिजनच जाणे. मनाची घालमेल तगमग, येरझाच्या हेलपाट्यातील ससेहोलपट अनुभवायची तर गजाआडच्या मनाचा गुंता समजून घ्यायला हवा. असे नसतेच मुळी की तुरुंगात फक्त गुन्हेगार असतात अन् बाहेरचे जग सावांचे असते. कायदा, साक्ष, पुरावे, जबान्यांच्या जबड्यात जे अडकतात ते तुरुंगात जातात. किती तरी छोटे मासे गिळलेले महामासे चतुर, चाणाक्षपणे कायद्याच्या जंजाळातून चकवा देत संभावितपणे फिरत असतात. म्हणून रियाझ बादशहांना म्हणावे लागते-
जेव्हा मी या जगाचा इतिहास लिहीन,
त्यात माझ्यावर झालेला अन्याय लिहीन,
निर्दोषींना दोषी करार देणाऱ्या
व्यवस्थेचा इतिहास लिहीन!
मला ‘गजाआडच्या कवितांचे महत्त्व अशासाठी की ही कविता पारंपरिक व्यवस्थेचा बुरखा फाडू इच्छिते, नवा इतिहास रचू इच्छिते, लिहू इच्छिते. या कवितांत माणूस, देश, देव, आई, प्रेयसी, पत्नी, घर, मुले-बाळे, जशी आहेत तसे चांदणे, नक्षत्र, आकाशही आहे. सर्वस्व हरवल्यानंतरच माणसास गमावल्यांची किंमत कळते. सारे जीवन शून्य झाल्यावर माणसास पूर्ण हरवल्याची वेदना, व्यथा अस्वस्थ करते. मग रमेश खाडे लिहिते होतात-
नाती-गोती सर्व काही
इथं विसरून जायचे,
फक्त आणि फक्त
गगनच पहायचे!
अन् तुरुंगातले प्रत्येक दिवस विदीर्ण काळीज, शून्य नजरा, हळवी मने, घेऊन वागवायचे. असे असते तुरुंगातील जिणे. या कविता आपणास तुरुंगातील जिणे समजावतात. एका नव्या अपरिचित मना, जनांची ओळख करून देतात. एकविसावे शतक साहित्याच्या संदर्भात ‘वंचितांचे शतक' राहणार आहे. आजवर ज्यांना समाजाने सारस्वतातून बहिष्कृत मानले त्यांच्या साहित्याचे हे शतक असेल. अनाथ, अंध, अपंग, देवदासी, वेश्या, तृतीयपंथी, बंदिजन, बकरे, खबरे, गोसावी, पारधीच आता साहित्याची पारध करते होतील असा आशावाद जागवणारा हा कवितासंग्रह म्हणून अधिक आश्वासक वाटतो. तो साहित्यिक निकषांवरही अधिक उमदा नि उजवा वाटतो.
संग्रहातील कवींना शब्दांची चांगली जाण आहे. लय नि लालित्याचेही भान आहे, असे शिवाजी साळुखे ‘सायरन...कारागृहातला' कविता वाचताना