‘गजाआडच्या कविता' : बंदीबांधवांचे व्यथाकाव्य
महाराष्ट्रातील तुरुंगात शिक्षा भोगणा-या बंदिजनांनी केलेल्या कवितांचा संग्रह आहे ‘गजाआडच्या कविता'. मुळात कविमनाची संवेदना लाभलेल्या व सध्या नाशिकच्या ‘सकाळ'चे संपादक म्हणून कार्यरत असलेल्या श्री. उत्तम कांबळेनी तो संपादित केलाय. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने तो प्रकाशित केला आहे.
कारागृहातील बंदिजनांच्या मनाची घालमेल प्रतिबिंबित करणा-या या काव्यसंग्रहाचे साहित्यिक मूल्य तर आहेच; पण त्यापेक्षा त्याचे सामाजिक मूल्यही महत्त्वाचे वाटते. यानिमित्त आजवर महाराष्ट्र सारस्वताच्या परीघाबाहेर राहिलेल्या कवींच्या रचना केंद्रगामी झाल्या. या कवितांना आरक्षण, सवलतीचे लेबल लावून सहानुभूतीच्या कुबड्या देऊन त्यांना प्रोत्साहन, प्रशंसा देण्याची गरज नाही. कारण या बंदिजनांच्या भोगण्यातून, तुरुंगाच्या एकांतातून निर्माण झाल्यात. त्या स्वतः इतक्या प्रगल्भ नि प्रबुद्ध आहेत की त्यांच्या प्रतिभेचे मूल्यमापन केवळ भावनेच्या कसोटीवरच (खरे तर संवेदनेच्या!) शक्य आहे.
तुझ्या एका नकारात
आयुष्य उद्ध्वस्थ करणारा तुरुंग आहे.
आता मी एक कैदी,
उर्वरित आयुष्य एक तुरुंग आहे.
नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील नरेश राठोडच्या या ओळी वाचकांच्या मनात संवेदनेचा सुरुंग पेरतात नि उडवतातही. 'काळ्याकभिन्न दगडांच्या भिंतीत कोंबलेला माणूस (हितेश शहा) ज्यांना समजून घ्यायचा आहे, त्यांना ‘गजाआडच्या कविता' वाचण्याशिवाय पर्याय नाही. तुरुंग माणुसकीला पारखे झालेले एक अमानुष बेटच म्हणायला हवे. तुरुंग माणसातील धगधगणाऱ्या निखाऱ्यांची कायद्याच्या एका फपकाऱ्याने (नि फटका-यानेही) राख करून टाकतो. क्षणात माणसाचे जीवन उद्ध्वस्त होते. होत्याचे नव्हते कसे, का केव्हा, कुठे होते ते पाहायचे तर तुरुंगाशिवाय दुसरी जागा नाही. तुरुंग ही घुसमट असते. असतो तो कोंडमारा. गुदमरलेपण काय असते हे तुरुंगातील