Jump to content

पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

येते. ही या संग्रहातील व्यवच्छेदक रचना होय. वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज नाशिकच्या कारागृहात तेथील बंदिजनांच्या कविता ऐकण्यास गेले असता त्यांनी अशा संग्रहाची कल्पना मांडली. त्यामुळे कारागृहातील बंदिजनांच्या मनात कुसुमाग्रजांबद्दल अपार आस्था. ती ‘सायरन' कवितेत प्रतिबिंबित झाली आहे. अनेक अंगांनी ही कविता अंगावर येते.
 तुरुंगांना व्यक्ती संदर्भ असतो तसा इतिहासही. तुरुंगातले जीवन रोज रजा, पॅरोल, मेडिकल, पनिशमेंट, जमिनीवर बदलत असते. एका कैद्यास जामीन मिळालेला. तो जामीनदाराच्या रकान्यात कुसुमाग्रजांचे नाव लिहितो. तेच त्याचे तुरुंगातील एकमेव आशास्थान. तुरुंगाच्या भिंतींना बातम्यांचे वावडे असते. कैद्याला कळते ते केव्हाच निवर्तले. तो प्रसंग शब्दबद्ध होतो तेव्हा ‘गजाआडच्या कवितेस साहित्य, समीक्षा, समाज संवेदना, लालित्य प्रतिभा अशा कोणत्याच बेगडी परिणामांची गरज उरत नाही.  जगातले श्रेष्ठ साहित्य, अनुवाद, कविता, इतिहास, तत्त्वज्ञानाचे लेखन, तुरुंगातच झाले. 'गजाआडच्या कविता' चा संदेश घेऊन येतात. पापाचे खरे प्रायश्चित्त पश्चात्ताप असतो. तो झाला की, मग वेगळ्या शिक्षेची गरज राहात नाही. यातील अधिकांश कवितांत पश्चात्तापाचा दाह आढळतो. आपले समाजमन अजून क्षमाशील होऊ पाहात नाही. या कविता समाजाला क्षमाशील करू इच्छितात. या कविता ‘माणूस आतल्या आत किती प्रवास करतो' ते समजावितात. या कवितांत प्रेम, प्रणयाची ओढ आहे तशीच विरहाची तगमगही. ही कविता मन हे दचकून दंग होते, असे व्हावयास नको होते याची कबुली देते. यातील कविता दूर राहिलेल्या गावाशी हितगुज करते. देव देवळात नसतो... अल्ला मशिदीत नसतो... तो माऊलीच्या हृदयात असतो, म्हणणारा मातृप्रेमी कवी इथे आहे. इथल्या कवींच्या लेखी तुरुंग म्हणजे खोटारड्या जगाची खरी ओळख आहे. या कवितांत शाहिरी आहे, देशप्रेमही आहे. ईश्वराचा हताश धावा आहे. या कवितांत फुले, फांदी, पौर्णिमा नि चांदणेही भरलेले आहे. आठवणीने व्याकूळ होणाच्या ‘गजाआडच्या कविता माणूस झाला छोटा ची जाणही देत्या होतात, तेव्हा त्या वेगळ्या समेवर पोहोचतात.


‘गजाआडच्या कविता' (काव्यसंग्रह)

 संपादक - उत्तम कांबळे,
 प्रकाशन - महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई

 पृष्ठे - ४७  किंमत - ३0 रुपये.

♦♦

वेचलेली फुले/८८