Jump to content

पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'त्रिवेणी' : गुलजार अल्पाक्षरी काव्य


 एकाच माणसाची किती रुपे असू शकतात! कथाकार, कवी, चित्रपट, गीत लेखक, संवाद लेखक, पटकथा लेखक, चित्रपट दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, सतारवादक, मित्र, प्रेमी, पती, संस्कारी पिता नि सर्वांत महत्त्वाचे रूप म्हणजे संवेदनशील मनुष्य' या साऱ्या गुणवैशिष्ट्यांनी कुपीबद्ध व्यक्तिमत्त्व म्हणजे गुलजार. गुलजार देशाच्या फाळणीत पाकिस्तानातून भारतात आले. जीवन संघर्षाने त्यांना दोन गोष्टी बहाल केल्यात. एक जीवन जगण्याच्या जाणिवांची बेचैनी नि दुसरी ती व्यक्त करण्याची संवेदनशील प्रतिभा. गुलजारांची कविता जगणे घेऊन येते. आश्वस्त करते. आत्मिक प्रचिती देत जगण्यावरची श्रद्धा वाढवते. जगणे समजावते. अशाच छोट्या कवितांचा संग्रह आहे ‘त्रिवेणी.'

 ‘त्रिवेणी' हे संकलनाचे शीर्षक असले तरी खरे तर ते स्वरूपसूचक आहे. ‘त्रिवेणी' गुलजारांनी शोधून काढलेल्या, घडवलेल्या छंदाचे नाव. हा छंद त्रिपदी आहे. संस्कृत, मराठी, हिंदीसारख्या भारतीय काव्यात दोन, चार, पाच ओळींचे छंद विपुल, त्रिपदी छंद अपवाद. ‘गायत्री' सारखा आठ अक्षरी, त्रिपदी छंद सर्वश्रुत आहे. गुलजार मुळात कवी, गायक, संगीतकार असल्याने रियाझावर त्यांचा विश्वास आहे. किंबहुना रियाझ हीच त्यांच्या काव्याची बैठक होय. तेच त्यांचे अधिष्ठान होय. मला आठवते त्यांच्या प्रारंभिक त्रिवेणी मी तत्कालीन ‘सारिका' पाक्षिकात (नंतर ते मासिक होऊन बंद झाले.) १९७२७३ च्या दरम्यान वाचल्या होत्या. ‘सारिका' तसे कथेस वाहिलेले पाक्षिक; पण त्यात अधेमधे छोट्या काव्य नि कथारचना (लघुकथा, लघुकाव्य) प्रकाशित होत राहायच्या. तब्बल सत्तावीस, अठ्ठावीस वर्षांच्या दीर्घ रियाझाची फलश्रुती म्हणजे 'त्रिवेणी' छंदाची निर्मिती.

 ‘त्रिवेणी' हे तीन ओळींचे काव्य, हायकूसारखे छोटे. हायकूही त्रिपदी काव्यच. पण ते प्रामुख्याने निसर्गाला समर्पित. गुलजारांची ‘त्रिवेणी' म्हणजे संयुक्त नि संक्षिप्त गझलच. दोन ओळींचा एक शेर असतो त्रिवेणीत. गुलजारांनी या ओळींना गंगा, यमुना म्हटले आहे. तिसरी ओळ सरस्वतीसारखी असते. गंगा, यमुनेतून निर्माण होणारी नि परत त्यांच्यातच विलीन होणारी. त्रिवेणीची

वेचलेली फुले/७१