‘समतेच्या दिंडीचे धारकरी' मधील आद्य समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले आलेखात व्याख्यात्या लेखकाने भाषणातून होणा-या संवादाचा फायदा घेऊन जोतिबांचे जीवन व कार्य संक्षेपाने व साक्षेपाने हृदयापर्यंत भिडेल अशा पद्धतीने सादर केले आहे. प्रसंगातून समाजसुधारकांचे जीवन, कार्य नि विचार व्यक्त करण्याची लेखकाची हातोटी त्याच्यातील शिक्षकाचा परिचय देते. जोतिबांची पारिवारिक स्थिती यशवंताला दत्तक घेणे, फुल्यांवर प्रभाव पाडणारे ग्रंथ, स्त्री व शूद्रांची उपेक्षा अशा कितीतरी अंगांनी प्रा. पाटगावकरांनी महात्मा फुलेंची समतादृष्टी स्पष्ट केली आहे. ते कुठेही संस्कार करण्याची भूमिका घेत नाहीत. पण ते प्रसंग ज्या जिवंतपणे आपल्या लेखनातून सादर करतात त्यामुळे न पुसून टाकता येणारा प्रभाव वाचक वा श्रोत्यांवर झाल्याशिवाय राहात नाही.
‘समतावादी लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती' मध्ये शाहूंनी १९१७ साली केलेला सार्वत्रिक शिक्षणाचा कायदा या लोकराजाच्या समतेच्या दूरदृष्टीचा आवाका लक्षात आणून देतो. विविध वसतिगृहे, मागासवर्गीयांच्या दरबारातील नियुक्त्या, सत्यशोधक हॉटेल, डॉ. आंबेडकरांना साहाय्य अशा प्रसंगांच्या पेरणीतून छत्रपती शाहू महाराज हे कसे सत्यशोधक, समतावादी, कर्ते सुधारक राजर्षी होते ते स्पष्ट होते. तत्कालीन संस्थानिकांच्या पार्श्वभूमीवर शाहू महाराज कसे वेगळे होते हे बिंबवण्याचे कार्य या लेखातून अत्यंत प्रभावीपणे साध्य झाले आहे. वेदोक्त प्रकरण, आर्यसमाज, सत्यशोधक समाज, आंतरजातीय विवाह असे शाहू महाराजांचे अनेक पैलू या व्याख्यानातून स्पष्ट होतात. शाहूंचे समतावादी राजरूप आपल्यापुढे साकारते.
‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जीवनधारा' रेखांकित करणारा या ग्रंथातील आलेख प्रारंभीच्या 'आई' या पाण्यासाठीच्या आर्त हाकेने आपले हृदय पिळवटून टाकतो. जो वक्ता या लेखक, श्रोता या वाचकांना हालवतो, हेलावतो तोच संस्काराची क्षमता धारण करीत असतो. प्रेमचंद, खांडेकर, साने गुरुजी, शरदचंद्र चटर्जीच्या लेखन व विचारांचा लेखकावर असलेला पगडा इथे उघड होतो. डॉ. आंबेडकरांनी परिस्थितीवर मात करून आपले जीवन कसे फुलविले ते खुलवत लेखक या भीमपराक्रमी पुरुषाचे ऊर्जस्वल जीवन वाचकांपुढे ठेवतो. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा बाबासाहेबांचा मंत्र अधोरेखित करत लेखकाने या दलितोद्धारकाचे कार्य समकालीन संदर्भाच्या पार्श्वभूमीवर प्रस्तुत केले आहे.
‘राष्ट्रपिता महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग, त्यांची सत्याग्रही वृत्ती, स्वातंत्र्यलढ्यातील विविध चळवळी यातून महात्मा गांधींची स्पष्ट होणारी