समतेच्या दिंडीचे धारकरी : सामतावादी, भाषणसंग्रह
‘समतेच्या दिंडीचे धारकरी' हे पुस्तक प्रा. चंद्रकांत पाटगावकर यांच्या व्याख्यानांचा लिखित संग्रह. प्रा. पाटगावकर यांनी गेल्या दहा-बारा वर्षांत सुमारे सव्वासातशे शाळा-महाविद्यालयांतून मानधन वा प्रवासखर्च न घेता ही व्याख्याने दिली. तिचा लाभ तीन लक्ष विद्याथ्र्यांना झाला. आद्य समाजक्रांतिकारक महात्मा जोतिबा फुले, समतावादी लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी, क्रांतिकारी संत साने गुरुजींसारख्या समतेचा पंचप्राण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजसुधारकांची जीवनगाथा प्रा. पाटगावकर आपल्या अमोघ वक्तृत्व शैलीत विद्यार्थ्यांसमोर सादर करतात, तेव्हा विद्यार्थी श्रोते केवळ मंत्रमुग्ध होत नाहीत तर ते कार्यप्रवण होतात, हे त्यांच्या व्याख्यानाचे वैशिष्ट्य होय. व्याख्यानांना स्थल, काल व संख्येची मर्यादा असते. व्याख्यानांपासून वंचित राहिलेल्या लाखो विद्यार्थी, पालक शिक्षकांपर्यंत समतेचा विचार पोहोचवणे या ग्रंथांमुळे शक्य झाले. ती एक सामाजिक गरज होती. कल्पक प्रकाशनाने अल्पदरात हा ग्रंथ उपलब्ध करून देऊन समता संक्रमणास मोठे साहाय्य केले आहे. आज जातीय शक्ती, नवे चेहरे, बुरखे घेऊन डोळे वर करून पाहात आहेत. समतेचा विचार धारक-यांच्या सतर्कतेने परंतु नि:शस्त्र राहून ज्या समाजसुधारकांनी जपला, जोपासला व ज्यांच्या जिवानिशी प्रयत्नांमुळे या जीवनमूल्यांना जोम आला आला अशांची दिशादर्शक जीवनधारा प्रा. पाटगावकरांची ही लेखरूप व्याख्याने आपणापुढे सादर करतात. नव्या पिढीस समता, स्वातंत्र्य, बंधुता, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, विज्ञाननिष्ठा, एकात्मतासारखी जीवनमूल्ये, प्रभावीपणे देणे काळाची गरज झाली आहे. संविधानाचे पुनर्मूल्यांकन करू पाहणाच्या शक्ती मागील दाराने मनुवाद रुजवू पाहत आहेत. अशा परिस्थितीत कोवळ्या वयात मानवतावादाचे संस्कार करणे अनिवार्य झाले असल्याने ‘समतेच्या दिंडीचे धारकरी' सारखे पुस्तक आता नवगीता, नवबायबल वा नवकुराण म्हणून उगवत्या पिढीपुढे ठेवले तरच आपण जातीय व धर्माध शक्तींचा मुकाबला समर्थपणे करू शकू.