वास्तव कथाकार इथे टिपत राहतो नि मग त्याच्या लक्षात येतं की बेवारस मृतदेह ओढणारा रघू दारू पिऊन हे काम आयुष्यभर करत राहतो. शेवटी पिंडाच्या कावळ्याची उपेक्षाच त्याच्या पदरी येते. माणसाचा कावळा झाल्याचं चित्रण करणारी शीर्षक कथा म्हणजे वर्तमानाचे ज्वलंत क्रौर्य होय.
‘दगडूमामा' तशी रेखाचित्रात्मक कथा. या संग्रहातील सर्वच कथांची शैली चित्रात्मक. दीपकच्या बालपणी दगडूमामा आधार देतो. आईचे रक्षण करतो. दीपक दगडूमामाच्या आधारावर मोठा होतो नि प्रतिष्ठितही. पण हीच प्रतिष्ठेची भिंत त्याच्या आड येते व बेवारस पडलेल्या दगडूमामाचा मृतदेह त्याच्या लेखी पोलीस पंचनाम्यातील ‘एक अनोळखी पुरुष जातीचा देह' होतो असा जिव्हारी अनुभव सांगणारी ही कथा संवेदनेची डूब देऊन वाचकास अंतर्मुख करते.
‘रांग'सारखी कथा मध्यमवर्गीय माणसाच्या असहाय्यतेचे चित्रण करत सध्याच्या जीवनातील रांगेचं नवं तत्त्वज्ञान सांगून जाते. 'आंधळं प्रेम', 'बातमी', ‘चकवा' या संग्रहातील कथांतील पात्रे, प्रसंग हे खरे होत, पण कथाकार पात्रांची नावे, प्रसंग इत्यादींत बदल करून ते काल्पनिक रूपात समोर ठेवत असला तरी रतीबाप्रमाणे घरी येणारे वृत्तपत्र परिपाठ म्हणून नित्य वाचणाच्या व विचार करणा-या लोकांना पूर्व घटना, व्यक्तींचे चपखल स्मरण देतात. यात पत्रकारांच्या कार्यकर्त्यांच्या दायित्वाचा उभा केलेला प्रश्न अधिक महत्त्वाचा नि म्हणून चिंतनीय वाटतो. पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आपल्या श्रेयवादाच्या नशेत सामान्यांचं दु:ख व बातमी प्रकाशनानंतर त्यांच्या (सामान्यांच्या) जीवनाची होणारी परवड कशी बेमालूम विसरतात त्याची बोच देणाच्या या कथा शोधक पत्रकारितेपुढे वृत्त प्रकाशानंतर पाठपुराव्याचा व खरे सामाजिक दायित्व निभावण्याची प्रेरणा देतात.
‘संत', 'पाऊस', 'वर्तुळ पूर्ण झालं', 'देवाची बाई'सारख्या संग्रहातील अन्य कथा समाजाचे अनेक प्रश्न चित्रित करतात. समाजातील अंधश्रद्धेमुळे भोंदु साधूचे कसे फावते, चित्रित करणारी ‘संत' कथा मोक्षानंद महाराजांना मोगरीचा मंगळ दूर करता करता राधा व समजुतानंदच्या पलायन व विवाहाने याच जन्मी मोक्षाचा साक्षात्कार घडवते. 'पाऊस' ही दारिद्र्याच्या पावसात नशिबाचे पीठ ओलावणारी हृदयद्रावक कथा होय. ‘वर्तुळ पूर्ण झालं' सारखी कथा संपत्तीचा हव्यास धरणाच्या मनोजसारख्या लोभींच्या डोळ्यात वास्तवाचे जळजळीत अंजन घालते.
‘दिवा लागला पणती विझली'कथा पुत्रप्राप्तीने मोक्ष शोधणा-यांना विचार